Join us  

क्षणाचाही विलंब न करता पक्षासाठी आमदारकी सोडायची तयारी दाखवणारे राजीव सातव!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 12:44 PM

एकनिष्ठ, पक्षनिष्ठ राजीव सातव !

ठळक मुद्दे२०१४ च्या कठीण परीक्षेत महाराष्ट्रातून काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण आणि राजीव सातव हे दोघेच लोकसभेत पोहचले होते. त्याआधी आमदार, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांनी विविध राज्यात तरुण कार्यकर्त्यांचे जाळे घट्ट केले होते

धर्मराज हल्लाळे

उमदे नेतृत्व, सदोदित हसतमुख, दिलखुलास, प्रत्येकाच्या मदतीला तत्पर, नेतृत्वाशी एकनिष्ठ अन्  पक्षनिष्ठ राजीव सातव यांचे जाणे स्वीकारणे कठीण आहे. महाराष्ट्रातील, विशेषतः मराठवाड्यातील ज्या नेत्यांनी दिल्लीत स्वतःचे स्थान निर्माण केले त्यापैकी एक राजीव सातव. कमी वयात स्वतःची देशपातळीवर ओळख निर्माण केली. आमदार, खासदार आणि युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद भूषविताना देशभर भ्रमंती केली. राजकारणात चढ उतार असतात. जय पराजय असतो. पक्ष, नेते अडचणीत येतात. अशा वेळीच नेतृत्व कौशल्य दिसते आणि ते त्यांनी समर्थपणे दाखवून दिले.

२०१४ च्या कठीण परीक्षेत महाराष्ट्रातून काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण आणि राजीव सातव हे दोघेच लोकसभेत पोहचले होते. त्याआधी आमदार, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांनी विविध राज्यात तरुण कार्यकर्त्यांचे जाळे घट्ट केले होते. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आम्ही जवळून अनुभवले. दौऱ्यात सोबत असताना चिकमंगळूर, तुमकूर, शिमोगा जिल्ह्यातील तरुणांना पक्षाशी किती आणि कसे जोडले होते हे पाहिले. अलीकडे गुजरात निवडणुकीत त्यांनी केलेला संघर्षही सर्वांनी पाहिला. राहुल गांधी यांचे विश्वासू सहकारी अशी ओळख देशभर होती. उत्कृष्ट संसदपटू राहिले.

युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवताना राष्ट्रीय नेतृत्वाने राजीव सातव यांच्यात अनेक गुण पाहिले. एकदा स्वतः त्यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या प्रवासाबद्दल सांगितले होते. निष्ठा हा अडीच अक्षरांचा शब्द अनेक परीक्षा घेत असतो. त्यागवृत्ती ही त्याची पहिली पायरी आहे. तुम्ही जेव्हा मोठी जबाबदारी घेता तेव्हा त्यासाठी कोणता त्याग करू शकता, हे समाज पाहतो. राजीव सातव प्रथमच आमदार म्हणून निवडून गेले होते. अशावेळी कोणी म्हटले, तुम्ही आमदारकी सोडा आणि पक्ष कार्यात योगदान द्या, तर कोणीही विचार करेल. व्यवहार्य निर्णय नाही, असेच वाटेल. मात्र सातव यांनी आपल्या नेतृत्वाला क्षणात शब्द दिला, मला पक्ष आदेश महत्वाचा. ज्या पक्षाने आमदार केले, तोच पक्ष ठरवेल पुढे काय करायचे. प्रसंगी आमदारकी सोडण्याची तयारी राजीव सातव यांनी आपल्या नेत्यापुढे दर्शवली. तिथेच सातव यांनी विश्वास जिंकला. ते आमदारही राहिले आणि राष्ट्रीय अध्यक्षही झाले. निष्ठा बाळगणे आणि ती निभावणे सोपे नसते. पद, प्रतिष्ठा याची लालसा न ठेवता आपण दुसऱ्यासाठी अर्थात इथे पक्षासाठी काही करू शकतो, ही भावना त्यांची होती. राजकारणात तरूण पिढीला मार्गदर्शक ठरलीत असे बोलके, कर्ते नेतृत्व आपण गमावून बसलो.

टॅग्स :राजीव सातवकोरोना वायरस बातम्याआमदारकाँग्रेस