Join us  

'मोफत उपचारांबाबत राजेश टोपे उल्लू बनवत आहेत, पुरावे दाखवा अन्यथा राजीनामा द्या'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2020 12:11 PM

राज्यातील शासकीय व पालिका रुग्णालयांचे कोरोना रुग्णालयात रुपांतर करण्यात येत आहे

ठळक मुद्देराज्यातील शासकीय व पालिका रुग्णालयांचे कोरोना रुग्णालयात रुपांतर करण्यात येत आहेविशेष म्हणजे, आत्तापर्यंत या योजनेच्या माध्यमातून 1 लाख 20 हजार रुग्णांवर मोफत उपचार झाल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सांगितलंय.

मुंबई - कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन महात्मा फुले जन आरोग्य योजनेत आता राज्यातील सर्वांनाच उपचाराचा लाभ देण्याचे निश्चित केले आहे. आरोग्य विभागाने याबाबत जारी केलेल्या आदेशानुसार कोरोनाबाधित रूग्ण तसेच कोरोनाची लागण नसलेल्या राज्यातील १२ कोटी नागरिकांना या निर्णयामुळे महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत असलेल्या सर्व रुग्णालयात उपचार घेता येणार आहेत. मात्र, राज्य सरकारची ही योजना फसवी, असल्याचे सांगत मनसेने आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 

राज्यातील शासकीय व पालिका रुग्णालयांचे कोरोना रुग्णालयात रुपांतर करण्यात येत आहे. शासकीय व पालिका रुग्णालयांमध्ये गुडघेबदल शस्त्रक्रिया व अन्य १२० उपचारांसाठीच्या विशेष व्यवस्थेचा लाभ यापुढे जन आरोग्य योजनेतील खासगी रुग्णालयातही घेता येणार आहे. तसेच, कोरोना रुग्णांवरही याच योजनेच्या माध्यमातून मोफत उपचार होतील, असे सरकारने स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे, आत्तापर्यंत या योजनेच्या माध्यमातून 1 लाख 20 हजार रुग्णांवर मोफत उपचार झाल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सांगितलंय. मात्र, आरोग्यमंत्र्यांच्या या दाव्याला मनसेनं खोटं असल्याचं म्हणत राजेश टोपे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 

मनसेचे नेते गजानन काळे यांनी आपल्या फेसबुक पोस्टवरुन, या योजनेचा केवळ 1 ते 2 टक्के रुग्णांनाच फायदा होत असून योजना फसवी असल्याचे काळे यांनी म्हटलंय. “मुळातच महात्मा फुले जनआरोग्य योजना ही कोरोना पेशंट व्हेंटिलेटरवर असेल तरच लागू पडते आणि अशा रुग्णांची संख्या एक ते दोन टक्क्यांच्यावर असत नाही. हॉस्पिटलमध्ये देखील चौकशी केल्यास हेच उत्तर दिले जाते की आपला रुग्ण व्हेंटिलेटरवर असेल तरच तुम्हाला ही योजना लागू आहे, असे शेकडो अनुभव राज्यातील जनतेला आले आहेत. तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या हेल्पलाईन क्रमांकावर (१५५३८८/ १८००२३३२२००) संपर्क केल्यास हीच माहिती मिळते.”

“मग महाराष्ट्रात १ लाख ६४ हजार कोरोनाबाधित रुग्ण संख्या असताना १ लाख २० हजार रुग्णांना या योजनेतून कसा लाभ मिळू शकेल असा प्रश्न मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी उपस्थित केला आहे. राजेश टोपे खोटे बोलत आहेत आणि उल्लू बनवत आहेत, त्यासाठी त्यांनी एक तर या १ लाख २० हजार रुग्णांना मोफत उपचार दिल्याचे पुरावे सादर करावेत अथवा महाराष्ट्राची माफी मागून मंत्रीपदावर असताना खोटे बोललो म्हणून राजीनामा द्यावा अशी मागणी मनसेने केली आहे.”  

टॅग्स :मनसेराजेश टोपेमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसहॉस्पिटल