घोटाळेबाज राजेंद्र लोढा आता ईडीच्या रडारवर, १०० कोटींचे मनी लॉड्रिंग; १४ ठिकाणी टाकले छापे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 13:45 IST2025-11-13T13:36:08+5:302025-11-13T13:45:22+5:30
Crime News: लोढा समूहामध्ये १०० कोटी रुपयांचा कथित घोटाळा केल्याप्रकरणी सध्या मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या ताब्यात असलेला लोढा समूहाचा माजी संचालक राजेंद्र लोढा आता ईडीच्या रडारवर आला असून, त्याच्याशी निगडित १४ ठिकाणी ईडीने मंगळवारी छापेमारी केली.

घोटाळेबाज राजेंद्र लोढा आता ईडीच्या रडारवर, १०० कोटींचे मनी लॉड्रिंग; १४ ठिकाणी टाकले छापे
मुंबई - लोढा समूहामध्ये १०० कोटी रुपयांचा कथित घोटाळा केल्याप्रकरणी सध्या मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या ताब्यात असलेला लोढा समूहाचा माजी संचालक राजेंद्र लोढा आता ईडीच्या रडारवर आला असून, त्याच्याशी निगडित १४ ठिकाणी ईडीने मंगळवारी छापेमारी केली. यादरम्यान ईडीने नेमके काय जप्त केले याचा तपशील अद्याप समजू शकलेला नाही.
राजेंद्र लोढा हा लोढा समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक लोढा यांचा दूरचा भाऊ आहे. ज्यावेळी लोढा समूहामध्ये राजेद्र संचालक म्हणून कार्यरत होता, त्यावेळी त्याचा मुलगा साहिल याच्यासोबत संगनमत करत केवळ कागदोपत्री भूखंडांची खरेदी केली. काही भूखंडाची खरेदी कमी दराने विक्री केली तसेच टीडीआरचीदेखील कमी दराने विक्री करत कंपनीचे आर्थिक नुकसान केल्याचा ठपका ठेवत त्याच्या विरोधात मुंबईच्या ना. म. जोशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याने कंपनीची सुमारे १०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
आरोप काय आहेत?
या प्रकरणात मनी लाँड्रिंग झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर आता ईडीने या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला आहे. सप्टेंबर २०१३ ते ऑगस्ट २०२५ या कालावधी त्याने हा घोटाळा केला आहे. त्याने प्रामुख्याने कंपनीच्या मालकीच्या ठाणे, कल्याण, पनवेल येथील मालमत्तेमध्ये घोटाळा केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी राजेंद्र, साहिल लोढा, भारत नरसाना, नितीन वादोर, रितेश नरसाना यांच्यासह आणखी सहा लोकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
कुठे किती घोटाळा ?
पनवेल येथील एका भूखंड खरेदीमध्ये ३ कोटींचा घोटाळा, एकच जमीन पुन्हा विकत दोन कोटी ६५ लाखांचा घोटाळा
अंबरनाथ येथे बोगसरीत्या कंपनीच्या एका गृहनिर्माण प्रकल्पातील घरांची विक्री करत २७ कोटींचा घोटाळा
उषा एंटरप्राईज नावाच्या कंपनीद्वारे १० कोटींचा घोटाळा
याच कंपनीद्वारे आणखी १७ कोटींचा घोटाळा, उषा एंटरप्राईज राजेंद्र लोढाच्या निकटवर्तीयांची असल्याचा संशय
एनबीपी एड्युटेकची ९ कोटींची जमीन केवळ २ कोटी ७५ लाखांना विकली
तब्बल ७ लाख १५ चौरस फुटांच्या टीडीआरची कमी किमतीत विक्री