Join us  

'राजसाहेबांनी माझ्या मतदारसंघात एखादी सभा घ्यावी, मला आनंदच होईल'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 2:53 PM

काँग्रेसकडून मुंबई उत्तर मतदार संघातून मराठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांस लोकसभेची उमेदवारी दिली आहे.

मुंबई - काँग्रेसच्या लोकसभा उमेदवार उर्मिला मांतोडकर यांनी राज ठाकरेंच्या सभांचा कौतुक केलं आहे. तसेच, राजसाहेबांनी माझ्या मतदारसंघात सभा घेतल्यास मला आनंदच होईल. राज ठाकरेंची सभा नकोय, असं कुणाला वाटल ? असे म्हणत उर्मिला मांतोडकर यांनी राज ठाकरेंच्या सभेसाठी अप्रत्यक्षपणे आर्जव केलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंतीदिनी अभिवादन करण्यासाठी त्या आल्या होत्या. त्यावेळी, पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी आपले मत मांडले.  

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही निवडणूक लढवित नाही. मनसेच्या या निर्णयाने अनेकांनी सुटकेचा श्वास सोडला असेल. परंतु, मनसेच्या भूमिकेमुळे सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेचे झोप उडाली आहे. २०१४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दर्शविणारे राज ठाकरे यांनी यावेळी मोदींना रोखण्यासाठी दंड थोपटले आहेत. तसेच भाजपला पाडण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या पक्षांना मदत करण्याचा निश्चय केला आहे. याचा फायदा सहाजिकच काँग्रेस आणि राष्ट्रवादीला होणार आहे. त्यासाठी राज ठाकरेंनी नांदेड येथे पहिली जाहीर सभा घेत मोदी आणि अमित शहा यांच्यावर जबरी टीका केली. 

काँग्रेसकडून मुंबई उत्तर मतदार संघातून मराठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांस लोकसभेची उमेदवारी दिली आहे. मुंबई उत्तर मतदार संघात २८ टक्के मराठी मतदार आहेत. मराठी मतांवर डोळा ठेवूनच काँग्रेसने उर्मिलाला उमेदवारी दिले असून उर्मिलाही मतदारांशी मराठीतून संवाद साधताना दिसत आहे. त्यामुळे मराठीचा मुद्दा उर्मिलासाठी फायद्याचा ठरणार हे निश्चितच आहे. त्यातच आता मनसेचा गुडीपाडवा मेळावा शनिवारी शिवाजी पार्कवर आयोजित करण्यात आला होता. मनसेने लोकसभेसाठीची आपली भूमिका आधीच स्पष्ट केली आहे. त्यामुळे मनसेकडून उर्मिलाला मदत मिळणार का, मराठमोळ्या उर्मिलाच्या पाठिशी मनसे सैनिक पूर्ण ताकतीने उभे राहतील का, असे अनेक प्रश्न मेळाव्यापूर्वी उपस्थित होत होते. मराठीच्या मुद्दावर मनसेने उर्मिलाला पाठिंबा दिल्यास लोकसभा निवडणुकीसाठीचा तिचा मार्ग काही अंशी सुकर होणार आहे. आता, उर्मिलानेही राजसाहेबांनी सभा घेतल्यास अत्यानंद होईल, असे म्हटले. दरम्यान, उत्तर मुंबई मतदारसंघात 29 एप्रिल रोजी मतदान होत आहे. 

मुंबई उत्तर मतदार संघात उर्मिलासमोर भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांचे आव्हान आहे. गोपाळ शेट्टी यांनी गेल्या निवडणुकीत संजय निरुपम यांचा पराभव केला होता. याआधी या मतदार संघातून अभिनेता गोविंदाने २००४ मध्ये भाजपच्या राम नाईक यांचा पराभव केला होता. यामुळे सेलिब्रेटीसाठी हा मतदार संघ अनुकूल असल्याचे त्यावेळी दिसून आले होते. त्यावेळीप्रमाणेच उर्मिलाला देखील सेलिब्रेटी असण्याचा फायदा या निवडणुकीत होईल, का हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :उर्मिला मातोंडकरराज ठाकरेमनसेलोकसभा निवडणूकमुंबई