राज ठाकरे तुमचे चुकले, तुम्हीही काही नावं विसरलात..!
By अतुल कुलकर्णी | Updated: March 22, 2026 11:40 IST2026-03-22T11:40:29+5:302026-03-22T11:40:29+5:30
गुढीपाडव्यानिमित्त आपण केलेल्या भाषणात अनेक मुद्दे राहून गेले.

राज ठाकरे तुमचे चुकले, तुम्हीही काही नावं विसरलात..!
अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई
प्रिय राज ठाकरे, नमस्कार
गुढीपाडव्यानिमित्त आपण केलेल्या भाषणात अनेक मुद्दे राहून गेले. ज्यांच्यामुळे तुम्हाला असे भाषण करावेसे वाटले, ज्यांनी महाराष्ट्राची अशी अवस्था करून ठेवली अशा मान्यवरांच्या कार्याचा आधी गौरव करायला हवा होता. तुम्ही वाचलेली यादी अपुरी होती. त्यात आणखी अनेक मान्यवरांचे उल्लेख करायचे राहून गेले असावेत. ज्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्राची तुलना बिहार, उत्तरप्रदेशसोबत झाली त्यांचे उल्लेख करायला हवे होते.
तुम्ही ज्या घटनांचा उल्लेख केला नाही त्या खालीलप्रमाणे आहेत. पुढच्या वेळी भाषण करताना तुमची अडचण होऊ नये म्हणून अशा घटना लिहून पाठवत आहे. यादी खूप मोठी आहे; मात्र मोजक्या घटना लिहित आहे. जसे की, ठाण्यात पोलिस स्टेशनमध्ये फायरिंग करणाऱ्या लोकप्रतिनिधीचा तुम्ही आवर्जून उल्लेख करायला हवा होता. गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत एका लोकप्रतिनिधीने दुसऱ्या गटाच्या दिशेने फायरिंग केले. त्यामुळे आपली तुलना बिहारशी होऊ लागली. हे तुम्ही कसे काय विसरलात..?
एक पक्ष सोडून, दुसऱ्या पक्षात गेलेले आणि आपलाच पक्ष कसा खरा आहे असे सांगणाऱ्या पक्षाचे नेते, सर्वोच्च नेते झाले म्हणून दुसऱ्या राज्यातल्या हॉटेलमध्ये जाऊन टेबलवर डान्स करणारे नेते तुम्ही कसे विसरलात..? सभागृहात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा सुरू असताना मोबाईलवर रमी खेळणारे नेते, आम्हाला मतदान केले नाही तर तुमचा निधी रोखू अशी जाहीरपणे प्रेमळ धमकी देणारे नेते तुम्ही असे काय विसरलात..? मराठवाड्यातल्या एका जिल्ह्याला मध्यंतरीच्या काही घटनांनी उगाचच बदनाम करून सोडले. एका सरपंचाला जीव जाईपर्यंत मारणे, त्याचे व्हिडीओ शूटिंग करणे, ते व्हायरल करणे या गोष्टी इतिहासाने कधीच नोंद करून ठेवल्या आहेत. तुमच्या भाषणात त्या घटना का आल्या नाहीत..? महाराष्ट्राची ख्याती देशभर नेणाऱ्या अशा अनेक घटना मधल्या कालखंडात घडल्या. त्यांचा विसर आपल्याला पडला हे बरोबर नाही. साम, दाम, दंड, भेद या सोबतच भ आणि म ची बाराखडी पाठ असणारे अनेक नेते काही वर्षांपासून महाराष्ट्राच्या अभिजात भाषेत भर टाकत आहेत. अशा शब्दप्रभुंना तुम्ही कसे विसरलात..?
महाराष्ट्रात एक विधानसभा अशी होऊन गेली, ज्यात सगळ्या पक्षांनी सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही भूमिका निभावल्या. लग्न करण्यासाठी एक मुलगी पसंत केली. लग्न भलत्यात मुलीशी झाले... आणि आहेराचे पाकीट तिसऱ्याच घरात गेले... अशी अवस्था त्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणाची झाली. तुम्हीच सांगा, महाराष्ट्र स्वतंत्र झाल्यापासून अशी घटना कधी घडली होती का..? कॅरम असा फुटला आहे की कोणती गोटी, कोणत्या भोकात गेली तेच कळत नाही... हे तुम्हीच म्हणाला होतात. मग अशी घटना घडवणाऱ्यांचा उल्लेख तुमच्या भाषणात का आला नाही..?
महाराष्ट्र केवळ राजकीय नेत्यांनी घडवला नाही. अनेक भारी अधिकाऱ्यांनी महाराष्ट्राची उंची या काळात वाढवली. शंभर कोटी रुपये खर्च करून मीरा-भाईंदरचा उड्डाणपूल ज्या अधिकाऱ्यांनी बांधला त्यांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करेलच. नागपुरात एक उड्डाणपूल घराच्या गॅलरीतून गेला त्यामुळे गॅलरी पाडून टाकली. आता तिथेच एक उड्डाणपूल खिडकी जवळून जात आहे. त्यामुळे खिडकी पाडायची की घर यावर समिती बसवण्यात येणार आहे. पलावा सिटी ते डोंबिवली उड्डाण पुलाचे सकाळी उद्घाटन झाले आणि दुपारी त्यावर खड्डे पडले. अटल सेतूचे डांबर पहिल्या सहा महिन्यात निघाले.
अशा सगळ्या अधिकाऱ्यांना बोलावून तुम्ही खरे तर त्यांचा शिवाजी पार्कच्या सभेत जाहीर सत्कार करायला हवा होता. आमच्या करातून मिळणाऱ्या पैशांचे असे उत्तम वाटोळे करणाऱ्या या अधिकाऱ्यांचा तुम्ही साधा उल्लेखही केला नाही. त्या अधिकाऱ्यांना किती वाईट वाटले असेल, याची तुम्हाला कल्पना तरी आहे का? यापुढे जेव्हा भाषण कराल तेव्हा हे लक्षात ठेवा.
महाराष्ट्राच्या जडणघडणीत ज्यांनी योगदान दिले त्यांचा तुम्ही उल्लेख केला ते चांगले केले; मात्र महाराष्ट्राची तुलना यूपी, बिहारसारख्या राज्यांशी करू पाहणाऱ्या नेत्यांचा, अधिकाऱ्यांचा उल्लेख केला असता तर आपले भाषण परिपूर्ण झाले असते. नाणे गुरुजींच्या जमान्यात तुम्ही साने गुरुजींच्या गोष्टी सांगत आहात. मात्र, आम्ही सांगितलेली नावे घेतली असती तर तुमच्या धाडसाचे कौतुक झाले असते. हे पत्र ‘महाराष्ट्र नेक्स्ट’ या वेबसाईटवर टाकू की तुम्हाला थेट पोस्टाने पाठवू ? बाकी सगळे छान आहे.
तुमचाच, बाबूराव