राज्यासह देशभरातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलेली ठाकरे बंधूंची विजय सभा आज मुंबईत पार पडली. या सभेसाठी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांसह मराठी प्रेमींनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. जवळपास २० वर्षांनंतर सभेसाठी एकत्र आलेल्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी ही सभा गाजवली. त्यानंतर आता ही सभा आणि त्यामधील भाषणं यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहे. राज्यातील सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटातील नेत्यांच्याही प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. दरम्यान, आजच्या सभेतील राज ठाकरेंचं भाषण दमदार झालं, तर उद्धव ठाकरेंची नेहमीची रडारड सुरू होती असा टोला, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शितल म्हात्रे यांनी लगावला आहे.
आज झालेल्या विजय सभेनंतर शितल म्हात्रे यांनी समाजमाध्यमांवरून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यात त्यांनी लिहिले की, आजच्या मराठी अस्मिता मेळाव्यात राज ठाकरेंचं भाषण दमदार आणि प्रभावी झालं. बाकी उद्धव टाकरेंची नेहमीप्रमाणे रडारड आणि टोमणेबाजी जोरदार सुरू होती. त्यांचं भाषण एकदम रटाळ आणि कंटाळवाणं झालं. मूळ नाही की शेंडा नाही आणि अजेंडा काय होता? हे देवच जाणे, असे शितल म्हात्रे म्हणाल्या.
उद्धव ठाकरेंचं भाषण पूर्णपणे राजकीय होते. मुंबईची सत्ता मिळवण्यासाठीचा खटाटोपच त्यात दिसत होता. राज ठाकरे यांना सोबत घेतलं नाही तर आपलं काही खरं नाही हेच त्यांच्या भाषणातून दिसलं. बाकी उबाठा च्या भाषणाच्या वेळी राज साहेबांचा चेहराच स्पष्ट सांगतोय की परत एकत्र??? नको बाबा, असं भाकितही त्यांनी केलं.