Join us

"...त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो" भाषणात बोलायचं राहून गेलं, राज ठाकरेंनी पोस्ट करून सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 16:00 IST

विजयी मेळाव्यानंतर राज ठाकरे यांनी लगेच एक दिलगिरी व्यक्त करणारी पोस्ट केली.

Raj Thackeray: त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा जीआर रद्द झाल्यानंतर ठाकरें बंधूंचा विजयी मेळावा वरळीमध्ये पार पडला. यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे तब्बल २० वर्षांनी एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह होता. हिंदीच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे यांनी यावेळी सरकारवर निशाणा साधला. महाराष्ट्र, मराठी भाषा, मराठी माणूस या विषयांमध्ये कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटलं. मात्र हा कार्यक्रम संपल्यानंतर राज ठाकरे यांनी एक पोस्ट करत दिलगिरी व्यक्त केली.

राज्य सरकारने पहिलापासून हिंदी भाषा शिकवण्याचा निर्णय मागे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एकत्र विजयी मेळावा घेतला. या मेळाव्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने अनेकांनी आनंद व्यक्त केला. दोन्ही नेत्यांनी हिंदी भाषेच्या मुद्द्यावरुन यावेळी सरकारला इशारा दिला. मात्र मेळाव्यानंतर राज ठाकरे यांनी लगेच एक दिलगिरी व्यक्त करणारी पोस्ट केली. या आंदोलनात साथ देणाऱ्या सर्वांचे राज ठाकरे यांनी पोस्टच्या माध्यमातून आभार मानले.

"हिंदी सक्तीच्या बाबतीत मराठी माणसाने सरकारला झुकवलं त्यानंतर आज मुंबईत मराठी माणसांचा विजयी मेळावा झाला. या मेळाव्यात माझ्याकडून एक उल्लेख राहून  गेला, त्याबद्दल आधीच दिलगीरी व्यक्त करतो. हिंदी सक्तीच्या विरोधात मराठी वृत्तवाहिन्या, मराठी वर्तमानपत्रं, मराठीसाठी काम करणाऱ्या संस्था, अनेक दबावगट, तसेच काही मोजके कलाकार हे या लढ्याच्या वेळेस ठाम उभे राहिले त्या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन आणि आभार. मराठी अस्मितेसाठी ही झालेली एकजूट अशीच कायम राहील. पुन्हा एकदा मनापासून सगळ्यांचे मी आभार मानतो," असं राज ठाकरे यांनी म्हटलं. 

भाषणात बोलताना राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. आम्हाला एकत्र आणणं बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेक लोकांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं," असं राज ठाकरे म्हणाले. तसेच महाराष्ट्र, मराठी भाषा, मराठी माणूस या विषयांमध्ये कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही, असं राज ठाकरे म्हणाले. "उठसूट कोणालाही मारण्याची गरज नाही. पण इथं राहून जास्तीचा माज दाखवला तर कानाखाली जाळ काढायचाच," असंही राज ठाकरेंनी म्हटलं.

टॅग्स :राज ठाकरेमराठीउद्धव ठाकरे