Join us  

राज ठाकरे कालही माझा होता, आजही आहे आणि उद्याही राहणार - नाना पाटेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2018 5:40 PM

नाना पाटेकर यांनी राज ठाकरे कालही माझा होता, आजही आहे आणि उद्याही राहणार असं सांगत आपल्यात सगळं काही आलबेल असल्याचं सांगितलं आहे

मुंबई - बेकायदा फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरुन अभिनेता नाना पाटेकर आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात चांगलीच जुंपली होती. नाना पाटेकर यांनी फेरीवाल्यांची बाजू घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी अत्यंत कडक शब्दांत नाना पाटेकरांना खडे बोल सुनावले होते. यावर प्रतिक्रिया देताना नाना पाटेकर यांनी राज ठाकरेंचं वैयक्तिक नुकसान नाही, पण मनसेचं एक मत गेलं अशा शब्दांत खंत व्यक्त केली होती. मात्र आता नाना पाटेकर यांनी राज ठाकरे कालही माझा होता, आजही आहे आणि उद्याही राहणार असं सांगत आपल्यात सगळं काही आलबेल असल्याचं सांगितलं आहे. 'आपला मानूस' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्यांनी हे सांगितलं. लवकरच नाना पाटेकर यांचा  'आपला मानूस' चित्रपट रिलीज होत आहे. या चित्रपटाद्वारे अजय देवगण मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. 

‘राज माझा चित्रपट पाहणार नाही, असं होणार नाही. मी रागात बोललो होतो. रागावलं म्हणून कुणी आपलं माणूस सोडतो का? राज काल माझा होता, आज आहे आणि उद्याही राहील’, असं नाना पाटेकर यांनी म्हटलं आहे.

नाना पाटेकरांच्या या वक्तव्यामुळे सुरु झाला होता वाद - फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर बोलताना नाना पाटेकर बोलले होते की, 'मला काल कोणीतरी विचारलं की, फेरीवाल्यांना असं रस्त्यावरुन हुसकावून लावणं, मारणं योग्य आहे का ? माझं एकच म्हणणं आहे, सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे. अतिक्रमण नसावं वैगेरे सगळं मान्य आहे. माझी एक साधी वृत्ती अशी आहे की, मी जर माझ्या दोनवेळच्या भाकरीसाठी आज काम करत असेन, आणि ते काम मला नसेल तर मग काय मी काय करेन, तुम्ही खात असाल तर तुमच्या हातचं हिसकावून घेईन. त्यामुळे मला काम करु द्या. यात फेरीवाल्यांची काही चूक नाही. चूक तुमची आमची आहे. इतकी वर्ष का नाही कार्पोरेशननं डिमार्केशन केलेली ? आपण कॉर्पोरेशनला विचारलं का ?'. 

यानंतर राज ठाकरेंनी सुनावले होते खडे बोल - 'महात्मा नाना पाटेकर आज काहीतरी बोललेत ? नाना पाटेकर बोलताना 80 वर्षाच्या आजोबांचा एक टोन असतो', अशी टीका करताना राज ठाकरेंनी नाना पाटेकरांची नक्कलही करुन दाखवली. 'वेलकममध्ये भाजा विकत होता ना, त्यामुळे फेरीवाल्यांचा पुळका आहे', अशी उपहासात्मक टीका राज ठाकरे यांनी केली. 'नाना पाटेकर यांनी माहित नाही त्या गोष्टीमध्ये चोमडेपणा करणं बद करावं. नाना पाटेकर मराठीतला उत्तम कलावंत आहे, तुमचे चित्रपट बघू...पण नको त्या गोष्टीत पडू नका', असं राज ठाकरे म्हटले होते. 

राज ठाकरे यांनी नाना पाटेकर यांना नाम संस्था सुरु करण्यावरुन प्रश्न विचारले. 'महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्नही सरकारने सोडवायचा आहे, मग कशाला संस्था काढली. संस्था काढण्यापेक्षा सरकारकडे जायला पाहिजे होतं. जिथे सरकारला जमत नाही, तिथे पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला ना मग आम्हाला शिकवायचं नाही', असं राज ठाकरेंनी सांगितलं होतं . 

'मराठी चित्रपटांना स्क्रिन मिळत नव्हती, तेव्हा नाना पाटेकर बोलल्याचं आठवत नाही',  असा टोला राज ठाकरे यांनी लगावला. आम्ही तुझं अभिनंदन केलं पाहिजे तिथे संजय निरुपम कौतुक करतो असं सांगत राज ठाकरे यांनी खंत व्यक्त केली. यावेळी राज ठाकरेंनी दाक्षिणात्य नेते आणि अभिनेत्यांचं पुन्हा एकदा उदाहरण दिलं. पहा ते कसे एकत्र येतात. तुम्हाला यायचं नाही तर येऊ नका, पण चोमडेपणा कशाला करता. महाराष्ट्रात आमचंच कुंपण शेत खातय असा टोला राज ठाकरेंनी लगावला. 

नानांनी व्यक्त केली होती नाराजी - राज ठाकरे यांचे वैयक्तिक नुकसान नाही, पण मनसेचं एक मत गेलं, असं सांगत नाना पाटेकर यांनी पुढील निवडणुकीत मनसेला मत देणार नसल्याचे सांगितले होते. पुण्यात एनडीएच्या दीक्षांत समारोहासाठी नाना पाटेकर उपस्थित होते. त्यावेळी कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली होती.  फेरीवाल्यांची बाजू घेत ते म्हणाले, ‘राज ठाकरेंनी त्यांचा मुद्दा मांडला होता आणि मी माझा. प्रत्येकाला बोलण्याचा, मुद्दा मांडण्याचा अधिकार आहे. राज ठाकरे यांचं वैयक्तिक नुकसान नाही, पण मनसेचं एक मत गेलं. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. फेरीवाल्यांना त्यांना एक हक्काची जागा द्यावी. यानंतरही ते पदपथांवर बसत असल्यास त्यांच्यावर  कारवाई करावी.’ 

टॅग्स :नाना पाटेकरराज ठाकरे