Join us
Daily Top 2Weekly Top 5

Raj Thackeray: उद्या वर-वधूही लग्न होताच खेळाचा दर्जा मागतील; राज ठाकरेंनी घेतला शिंदे सरकारचा समाचार! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2022 14:17 IST

राज्यात सध्या राजकारण हा एक खेळ करुन टाकला आहे. खरंतर राजकारण गांभीर्यानं घेण्याचा विषय आहे.

मुंबई-

राज्यात सध्या राजकारण हा एक खेळ करुन टाकला आहे. खरंतर राजकारण गांभीर्यानं घेण्याचा विषय आहे. पण सध्याच्या सरकारच्या भाषेत सांगायचं झालं तर राजकारणाला खेळाचा दर्जा देऊन टाकला आहे. उद्या कोजागिरी, मंगळागौर आणि वर-वधू वरमाला घालताच द्या आता आम्हाला खेळाचा दर्जा असं म्हणतील, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिंदे सरकारच्या निर्णयाचा आज समाचार घेतला आहे. ते मुंबईत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित करत होते. 

मनसेचे पदाधिकारी सुस्त पडलेत, मी ते पत्र त्यासाठीच दिलेले...; राज ठाकरेंनी बैठकीत सुनावले

राज ठाकरे यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना विविध विषयांवर भाष्य केलं. "राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता अगं अगं म्हशी...हेच सुरू आहे. त्यामुळे निवडणुका कधी लागतील हे सांगता येत नाही. केव्हाही लागतील पण त्यासाठी आपण तयार राहायला पाहिजे. राजकारणात लोकांनी यायला हवं. कारण राजकारण अतिशय गांभीर्यानं घ्यायचा विषय आहे. तुमच्या घरात नळाला येणारं पाणी महानगरपालिका ठरवते. राजकारणाला तुम्ही तुच्छ मानता. मग मतदानाच्या दिवशी दोन-दोन तास रांगेत उभं राहून मतदान का करता? त्यामुळे राजकारण म्हणजे केवळ मतदान नव्हे. जनतेनं जागं होणं गरजेचं आहे. युवापीढीनं राजकारणात येणं खूप महत्वाचं आहे. सरकारला जाब विचारणं गरजेचं आहे", असं राज ठाकरे म्हणाले. 

शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयाचा समाचारराज ठाकरे यांनी यावेळी शिंदे सरकारनं दहीहंडीला दिलेल्या खेळाच्या दर्जाच्या निर्णयाचा आपल्या शैलीत समाचार घेतला. राजकारण हा गांभीर्यानं घेण्याचा विषय असल्याचं सांगताना राज ठाकरे यांनी शिंदे सरकारच्या निर्णयावर भाष्य केलं. "राज्यात सध्या ज्यापद्धतीचं राजकारण सुरू आहे. ते पाहता नुसता खेळ मांडला आहे असंच सर्वांच्या लक्षात येईल. खरंतर राजकारण गांभीर्यानं घेण्याचा विषय आहे. पण सध्याच्या सरकारच्या भाषेत सांगायचं झालं तर राजकारणाला खेळाचा दर्जा देऊन टाकला आहे. कोजागिरी, मंगळागौरलाही खेळाचा दर्जा देतील. उद्या लग्नात वरमाला गळ्यात पडली की खेळाचा दर्जा मागतील", असा टोला राज ठाकरे यांनी लगावला. 

टॅग्स :राज ठाकरेमनसे