Join us

राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 12:09 IST

MNS Raj Thackeray: मनसे पदाधिकाऱ्यांच्या मनात चलबिचल सुरू झाली असून, मनसेला जागा कुठे? जागा वाटपाचे कोडे सुटणार कधी?

MNS Raj Thackeray: महापालिका आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'मनसे'च्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांचा मेळावा वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात घेण्यात आला. जुने कार्यकर्ते, माजी पदाधिकारी, निवडणूक लढवलेले उमेदवार अशांना सोबतीला घेऊन पुढची वाटचाल एकत्र करायची आहे. प्रत्येक कार्यकर्ता आपला आहे. जुना सहकारी सोबत येत असल्यास मतभेद विसरून एकजुटीने काम करा, अशी सूचना राज ठाकरे यांनी केली. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी केलेल्या विधानांची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

कुणासोबत पटत नाही, आवडत नाही असे चालणार नाही. २० वर्षानंतर आम्ही दोघे भाऊ एकत्र आलो आहोत; पण तुम्ही एकमेकांशी का भांडता? तुम्ही एकत्र कधी येणार? असा सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धवसेनेच्या युतीबाबत प्रथमच भाष्य केले. महापालिकेत आपलीच सत्ता येणार आहे, असा विश्वास राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. तसेच महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा. मतदार याद्या व दुबार मतदानावर विशेष लक्ष केंद्रित करा. मुंबई महापालिकेत आपलीच सत्ता येणार आहे. युतीसंदर्भातील निर्णय घेऊन त्याबद्दल योग्य वेळी बोलेन, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. परंतु, मनसेची सत्ता येणार कशी? उद्धव ठाकरेंशी युती होणार की मनसे स्वबळावर लढणार? ठाकरे बंधूंची युती झाली, तर मनसेला किती जागा मिळणार? अशा अनेक मुद्द्यांवर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

जागांचे कोडे सुटणार कधी?

मनात मनसे पदाधिकाऱ्यांच्या चलबिचल सुरू झालीय. राज युतीबद्दल बोलल्याने त्यांच्या भुवया उंचावल्या. ते म्हणाले, आपलीच सत्ता येणार!' पण कशी? गेल्या निवडणुकीत उद्धवसेनेच्या जागा होत्या त्या वॉर्डात काही करता येणार नाही. आजूबाजूचा वॉर्डही 'त्यांचाच माणूस' घेऊन बसलाय! आणि आरक्षण? तो राजकीय 'लकी ड्रॉ' नशीब आणि यंत्रणांचं वेळेवर फिरणं यावर अवलंबून आहे. अशात मनसेला जागा कुठे? उद्धवसेनेसोबत युती करून सत्ता घेणार की स्वबळावर ? हा पदाधिकाऱ्यांच्या मनातला प्रश्न? त्यामुळे जागा वाटपाचा प्रश्न सुटणार कधी हे कार्यकर्त्यांना कोडे पडले आहे, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

दरम्यान, आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या वाढत चाललेल्या भेटी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. ठाकरे बंधू हे काही निमित्त मात्र एकत्र येणार की, महापालिका निवडणुकीत युती करणार, याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे. 

 

टॅग्स :राज ठाकरेमनसेमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाराजकारणमुंबई महानगरपालिका