Raj Thackeray on Election Voters list: "निवडणुकीच्या याद्यांमध्ये बराच घोळ आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी घराघरांमध्ये जा, लोकांना जागृत करा, गोष्टी तपासून पाहा. माझी मतदारांनाही विनंती आहे की, आमचे लोक किंवा इतर सहकारी पक्षाचे लोक जेव्हा येतील, तेव्हा त्यांना सहकार्य करा. एकेका घरामध्ये ८०० माणसे असल्याची नावे दिली जात आहेत. जे मतदार नाहीत अशांनाही यादीत दाखवले जात आहे. अशी सगळी खोटी नावे भरून निवडणुकीला सामोरे जाण्याचे या लोकांचे प्लॅनिंग आहे. पण जोपर्यंत ही मतदार यादी पूर्णपणे स्वच्छ होत नाही, सर्व राजकीय पक्षांचे जोपर्यंत समाधान होत नाही, तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊनच दाखवा," असे खुले आव्हान मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी निवडणुक आयोगाला दिले. मुंबईतील गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये मनसेचा पदाधिकारी मेळावा आज घेण्यात आला त्यावेळी राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवरही जोरदार टीका केली.
कोण सत्तेवर येईल याच्याशी मला कर्तव्य नाही...
"या महाराष्ट्रात निवडणुका जर शांतपणे पार पाडायच्या असतील तर, पहिली मतदार यादी स्वच्छ करा. जो मतदार आहे, त्याचा आदर करा. जो खरा मतदार आहे, त्यालाच मतदान करू द्या. कोण सत्तेवर येईल आणि कोण पराभूत होईल याच्याशी मला कर्तव्य नाही. पण जे मतदान होईल ते खरं होईल या दृष्टिकोनातून निवडणुका झाल्या पाहिजेत", असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
आणखी एक वर्ष गेलं तरी चालेल...
"मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांना आणि प्रमुखांना सांगतो की, प्रत्येक ठिकाणी कोण कोण राहतात, कोणाकोणाची नावे आहेत या सगळ्या गोष्टी तपासायला सुरुवात करा. हे ज्या-ज्या लोकांनी शेण खाऊन ठेवले आहे, ते सगळं बरोबर बाहेर येईल. इतरही लोक या विरोधात बोलत आहेत. पण आता महाराष्ट्रभर ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या पाहिजेत. खोटेपणा बाहेर आला पाहिजे. इतर पक्षातील लोकांनीही घराघरात जायला हवे, मतदार तपासून घ्यायला हवे. निवडणूक आयोगाला आमचं सांगणं आहे की हे जोपर्यंत स्वच्छ होत नाही, तोपर्यंत तुम्ही निवडणुका घेऊ नका. आधीच पाच वर्षे या सगळ्या गोष्टींना झाली आहेत, अजून एक वर्ष गेले तरी चालेल पण या महाराष्ट्रात मतदार यादीतील घोळ संपल्याशिवाय आणि याद्या स्वच्छ झाल्याशिवाय निवडणुका होता कामा नयेत," असा इशाराच राज यांनी दिला.
Web Summary : Raj Thackeray challenged the Election Commission to hold elections only after cleaning voter lists. He urged MNS workers to verify voter details, alleging discrepancies and demanding fair elections even if delayed by a year.
Web Summary : राज ठाकरे ने चुनाव आयोग को चुनौती दी कि मतदाता सूची साफ होने के बाद ही चुनाव कराएं। उन्होंने मनसे कार्यकर्ताओं से मतदाता विवरण सत्यापित करने का आग्रह किया, विसंगतियों का आरोप लगाया और एक साल की देरी होने पर भी निष्पक्ष चुनाव की मांग की।