Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरेंची नवी रणनीती, प्रत्येक जिल्ह्यावर आता मनसे संपर्क अध्यक्षांची नजर, कोणाची वर्णी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 07:12 IST

लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अपेक्षित यश न मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर मनसेने संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अपेक्षित यश न मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर मनसेने संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. २००९ मध्ये राबविण्यात आलेली पण कालांतराने निष्क्रिय झालेले संपर्क अध्यक्ष पद पुन्हा कार्यान्वित करून पक्षाला उर्जितावस्थेत आणण्यात येणार आहे. नवनियुक्त संपर्क अध्यक्षांची अधिकृत यादी सोमवारी जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यानंतर शिवतीर्थवर प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी पक्षाच्या सध्यस्थितीचा आढावा त्यांनी घेतला. शहर पातळीवर पक्षाचे काम शहराध्यक्ष पाहतात त्याचप्रमाणे जिल्हा पातळीवर संपर्क अध्यक्ष नेमण्यावर विचार करण्यात आला.

२००९ मध्ये ही पदे कार्यान्वित होती. संबंधित जिल्ह्याच्या कारभारावर त्यांचे नियंत्रण असल्याने तेथील घडामोडींची माहिती नेत्यांना मिळत होती. त्यामुळे २००९ मध्ये पक्षाला मोठे यश मिळाले होते याकडे पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले.

असे आहेत संभाव्य नवे संपर्क अध्यक्ष

मनसे नेते बाळा नांदगावकर, बंटी म्हशीलकर (छत्रपती संभाजीनगर), माजी आ. राजू पाटील, मनोज चव्हाण (पालघर), संदीप देशपांडे, योगेश परुळेकर (रायगड), अविनाश जाधव (नाशिक), नितीन सरदेसाई (रत्नागिरी), अभिजित पानसे, अमेय खोपकर (पुणे ग्रामीण), शिरीष सावंत, संजय नाईक (सिंधुदुर्ग), गजानन राणे (जळगाव), हेमंत गडकरी (वर्धा), हेमंत संबूस (चंद्रपूर), यशवंत किल्लेदार (कोल्हापूर). 

English
हिंदी सारांश
Web Title : Raj Thackeray's new strategy: MNS district heads to oversee.

Web Summary : MNS revives district heads post to boost organization after election setbacks. These 'Sampark Adhyaksh' will monitor district affairs. Appointments will be announced soon. This move aims to replicate the party's success from 2009.
टॅग्स :राज ठाकरेमहाराष्ट्र नवनिर्माण सेनामनसे