Join us  

इंदिरा गांधींविरोधात बाळासाहेबांनी काढलेलं 'ते' कार्टूनही व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 5:28 PM

प्रजासत्ताक दिनानिमित्त राज ठाकरे यांनी समाजमाध्यमांतून व्यंगचित्र काढत  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे.

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज काढलेल्या 'स्वतंत्रते न बघवते' या व्यंगचित्रामुळे तब्बल 39 वर्षांपूर्वी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याविरोधात काढलेले व्यंगचित्र व्हायरल झाले. बाळासाहेबांनी तेव्हा अशाच आशयाचे व्यंगचित्र 'मार्मिक' साप्ताहिकामध्ये काढले होते. दोन्ही व्यंगचित्रे ही केंद्रातील सरकारविरोधातच आहेत हे विशेष. 

प्रजासत्ताक दिनानिमित्त राज ठाकरे यांनी समाजमाध्यमांतून व्यंगचित्र काढत  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'प्रजासत्ताक' फासावर लटकवल्याची बोचरी टीका राज यांनी व्यंगचित्रातून केली आहे. तसेच यामध्ये मोदी यांचे हात बळकट करा असे शहा म्हणताना आणि फासाची दोर ओढण्यात मोदी यांना मदत करताना दाखविले आहेत. यावर भाजपानेही व्यंगचित्रातून उत्तर देत राज ठाकरे यांनाच फासावर लटकवल्याची टीका केली आहे. 

राज ठाकरे यांच्या आजच्या व्यंगचित्रात बाळासाहेब ठाकरे यांनी तब्बल 39 वर्षांपूर्वी काढलेल्या व्यंगचित्राची झलक दिसत आहे. बाळासाहेबांचे हे व्यंगचित्र 21 सप्टेंबर 1980 च्या मार्मिक अंकामध्ये प्रसिद्ध झाले होते. यामध्ये भारतमातेच्या गळ्याभोवती दोन बाजूंनी दोरखंड ओढताना दाखविला आहे. याला '...फास आवळला जातोय' असा मथळा दिला आहे. तर आजच्या राज यांच्या व्यंगचित्रामध्ये  'स्वतंत्रते न बघवते' हा मथळा देत भारतमातेच्या जागी प्रजासत्ताक दाखविण्यात आले आहे. 

मोदींकडून देशाच्या प्रजासत्ताकाला फाशी; राज ठाकरेंच्या कार्टूनने इंटरनेटवर कल्ला

टॅग्स :बाळासाहेब ठाकरेराज ठाकरेव्यंगचित्रकार