मुंबई
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेचा रविवारी दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर गुढीपाडवा मेळावा झाला. राज ठाकरेंनी नद्यांचं होत असलेलं प्रदूषण, इतिहास आणि सध्याचं राजकारण अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य करतानाच राजकीय पक्षांकडून सध्या राज्याच्या मूळ प्रश्नांपासून भरकटवलं जात असल्याचं म्हटलं. राज ठाकरे यांनी यावेळी तासाभराचं भाषण केलं. भाषण संपल्यानंतर ते आपल्या आसनाकडे परतले. त्यानंतर ते पुन्हा उपस्थितांना संबोधित करण्यासाठी पुढे आले आणि एका तरुणाची ओळख सर्व उपस्थितांना करुन दिली.
"या अशा तरुणांकडून आपल्याला उर्जा मिळते", असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. राज ठाकरेंनी ओळख करुन दिलेल्या तरुणाचं नाव प्रमोद आरणे असं आहे. राज ठाकरेंची सत्ता महाराष्ट्रात येण्यासाठी शिर्डी येथील प्रमोद आरणे या महाराष्ट्र सैनिकाने कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिरापासून ते शिवतीर्थ दादरपर्यंत पायी चालत "पक्षध्वज पायी संकल्प यात्रा" काल पूर्ण केली.
प्रमोद आरणेने त्यानंतर राज ठाकरे यांची शिवतीर्थ येथे भेटही घेतली. त्यांच्या पाया पडला. यावेळी राज यांनी त्याला शुभेच्छा दिल्या. याच प्रमोद आरणेला राज ठाकरेंनी आपल्या भाषणानंतर तर स्टेजवर आणलं आणि संपूर्ण महाराष्ट्राला त्याची ओळख करुन दिली. ते म्हणाले, "आजपर्यंत तुमचं जे प्रेम मला मिळालं आहे. त्याच प्रेमावर आजवर घोडदौड सुरू आहे. यासाठी ऊर्जा मला तुमच्याकडून मिळतेच. पण आपला एक नगर जिल्ह्यातला महाराष्ट्र सैनिक प्रमोद आरणे कोल्हापूरला अंबामातेचं दर्शन घेऊन तिथून तो चालत कोल्हापूरहून इथं मुंबईत आला आहे. तुमच्या सर्वांसाठी तो महालक्ष्मीचं दर्शन घेऊन आलेला आहे. मला असं वाटतं की हिच माझी ऊर्जा आहे"