Join us
Daily Top 2Weekly Top 5

"...तेव्हा तर अजित पवार तावातावाने बोलत होते"; मतदार याद्यांच्या घोळावरुन बोलताना राज ठाकरेंनी सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 14:54 IST

निवडणूक आयोगासोबत झालेल्या बैठकीनंतर बोलताना राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.

Raj Thackeray on Ajit Pawar: मतदार याद्यांतील घोळावरुन  राज्यातील प्रमुख विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आज पुन्हा एकदा राज्य निवडणूक आयुक्तांची भेट घेत आपल्या तक्रारी मांडल्या. यावेळी मतदार यादी आणि बोगस नावावरुन आगामी निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी मनसे आणि महाविकासच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाकडे केली. त्यानंतर महाविकास आघाडी आणि राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत मतदार याद्यांच्या घोळावर भाष्य केलं. निवडणूक आयोग मतदार याद्या दाखवत का नाही? असा सवाल राज ठाकरे यांनी केला. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही उल्लेख केला. 

निवडणूक आयोगाच्या निमित्ताने तुम्ही महाविकास आघाडीसोबत दिसत आहात असं एका पत्रकाराने म्हटलं. त्यावर राज ठाकरे यांनी भाष्य केलं. "मी २०१७ मध्येही यांच्यासोबत दिसलो होतो. आता निवडणूक कशी होणार हे महत्त्वाचे आहे. कोणा बरोबर होणार हे महत्त्वाचे नाही. २०१७ सालच्या पत्रकार परिषदेतसुद्धा मी हेच बोलत होतो. त्यावेळी काँग्रेसपण होती. तसेच अजित पवार पण त्यावेळी होते. खरंतर त्यांनी आज यायला पाहिजे होते. त्यावेळी ते तावातावाने बोलत पण होते. ते पण या सगळ्या गोष्टी सांगत होते," असं राज ठाकरे म्हणाले.

"निवडणुकीच्या यादीतील घोळ केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींसमोर आम्ही ठेवले आहेत. ते सुधारले पाहिजेत. ते सुधारुन विरोधी आणि सत्ताधारी पक्षाचे समाधान झालं पाहिजे.  जे निवडणुका लढवतात त्यांचे समाधान झाल्याशिवाय त्यांनी निवडणुका घेऊ नये ही आमची मागणी. याचा निवडणूक आयोगाने याचा विचार करायला हवा. याच्यामध्ये गुंतागुत असण्याचे कारण नाही. मतदार यादीतील घोळ समोर ठेवल्यानंतर ते आणि राजकीय पक्ष यांनी मिळून या याद्या सुधारल्या पाहिजेत. याद्या सुधारूनच निवडणुकांना सामोरे गेले पाहिजे. महायुतीच्या २३२ जागा निवडून आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शांतता होती. निवडून आलेल्यांना पण धक्का बसला," असेही राज ठाकरे म्हणाले.

सहा महिने गेले तर काय फरक पडतो - राज ठाकरे

"आम्ही निवडणूक आयोगाला हेच सांगितलं की मतदार याद्यांमध्ये सुधारणा होत नाहीत तोपर्यंत निवडणुका घेऊ नका. महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मागची पाच वर्षे झालेल्या नाहीत. याद्या सुधारण्यासाठी अजून सहाम महिने गेले तर काय फरक पडतो. आमची भेट झाल्यानंतर त्यांनी नोटिफिकेशन काढलं. त्यांनी आठ दिवसांची मुदत राजकीय पक्षांना दिली आहे. निवडणूक आयोग सहा, आठ महिने घेणार आम्ही आठ दिवसांत काय निर्णय घेणार? आम्ही नोटिफिकेशन रद्द करण्याची मागणी केली आहे. आता निवडणूक आयोग काय निर्णय घेणार ते पाहून आम्ही पुढची भूमिका ठरवू," असं राज ठाकरे यांनी म्हटलं. 

English
हिंदी सारांश
Web Title : Raj Thackeray slams Ajit Pawar over voter list irregularities.

Web Summary : Raj Thackeray criticizes Ajit Pawar regarding voter list issues, recalling Pawar's past strong stance. Thackeray demands electoral roll rectification before elections, echoing concerns shared by Maha Vikas Aghadi.
टॅग्स :राज ठाकरेअजित पवार