Join us  

राम मंदिराच्या ई-भूमीपूजनावरुन उद्धव ठाकरेंना टोला; राज ठाकरेंनी मांडली परखड भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 11:16 AM

लोकांच्या मनातील कोरोनाची भीती दूर झाल्यावर सगळं स्थिरस्थावर झाल्यावर राममंदिराचं धुमधाकडक्यात भूमीपूजन व्हायला हवं होतं.

ठळक मुद्देराममंदिराचं धुमधाकडक्यात भूमीपूजन व्हायला हवं होतं. हा लोकांच्या आनंदाचा भागआणखी २ महिने भूमीपूजन पुढे गेले असते तर बरं झालं असतंभूमीपूजन होतंय त्याचा आनंद मात्र त्याहून मंदिर निर्माण झालं तर जास्तच आनंद होईल

मुंबई – अयोध्येत राम मंदिर व्हायलाच हवं, ज्यासाठी असंख्य कार सेवकांनी प्राणांची आहुती दिली त्यामुळे राममंदिराचं भूमिपूजन व्हायला हवं पण सध्याची परिस्थिती बघता भूमिपूजनाची वेळ योग्य नाही. भूमीपूजन होतंय त्याचा आनंद मात्र त्याहून मंदिर निर्माण झालं तर जास्तच आनंद होईल. राम मंदिराचं भूमीपूजन धुमधडाक्यात व्हायलाच पाहिजे, ई-भूमीपूजन कशाला हवं? अशी परखड भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मांडली आहे.

याबाबत राज ठाकरे यांनी सांगितले की, राम मंदिराचं भूमीपूजन होतंय त्याचा अभिमान आहे, पण कोरोना काळात भूमीपूजन व्हायला पाहिजे का? तर लोक सध्या वेगळ्या मानसिकतेत आहे, आणखी २ महिने भूमीपूजन पुढे गेले असते तर बरं झालं असतं, कारण मोठ्या उत्साहात लोकांना हे साजरा करता आलं असतं. लोकांच्या मनातील कोरोनाची भीती दूर झाल्यावर सगळं स्थिरस्थावर झाल्यावर राममंदिराचं धुमधाकडक्यात भूमीपूजन व्हायला हवं होतं. हा लोकांच्या आनंदाचा भाग आहे त्यामुळे त्याचं ई-भूमिपूजन नको त्याचं जल्लोषात भूमीपूजन हवं असं त्यांनी सांगितले.

त्यासोबतच कोरोना काळात काळजी घेणं गरजेचे, पण घाबरुन घरात राहणं योग्य नाही, अनेक जण कोरोनातून बरे झाले आहेत, सरकारने लोकांना कोरोनाच्या दहशतीतून बाहेर काढणे गरजेचे आहे, मानसिकदृष्ट्या लोक खचत आहेत, त्यामुळे सरकारने हळूहळू सगळ्या गोष्टी सुरु कराव्यात, लोकांना कोरोना दहशतीच्या परिस्थितीतून बाहेर काढावं. इंग्लंडला सगळ्या गोष्टी उघडल्या आहेत, काळजी घ्यायला हवी पण लॉकडाऊन करुन हे साध्य होणार नाही असं सांगत त्यांनी लॉकडाऊन हटवण्याची मागणी राज ठाकरेंनी केली.

...म्हणून मी घराबाहेर जाणं टाळतो; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला खुलासा

दरम्यान, गेल्या ४-५ महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कारभार दिसला नाही, मुख्यमंत्री टीव्हीवर दिसले पण कारभार दिसला नाही, सध्या कोरोना काळ असल्यानं राजकारण करण्याची वेळ नाही, हे सर्व राहिले तर राजकारण करता येईल, सरकारच्या चुका झाल्या का? हो झाल्या, मग केंद्र सरकार असो वा राज्य सरकार, जगभरात कोरोनाचं संकट आहे, हे संकट कोणाला कळलं नाही, त्यामुळे कोणाला दोष न देता लोकांमधील भीती जाणं गरजेचे आहे, लोकांना मोकळा श्वास घेता यायला हवं, या परिस्थितीतून लोकांची सोडवणूक होणं गरजेचे आहे. लॉकडाऊन काढला की अनलॉक केला हे करुन आता चालणार नाही. सतत लॉकडाऊनमध्ये राहणं राज्याच्या दृष्टीने हिताचं नाही अशी भूमिकाही राज ठाकरेंनी मांडली.

 

टॅग्स :राम मंदिरराज ठाकरेउद्धव ठाकरेअयोध्या