Join us  

नरेंद्र मोदींच्या 'त्या' निर्णयासाठी राज ठाकरेंकडून अभिनंदन, व्यक्त केली अपेक्षा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2020 2:26 PM

अयोध्येत राम मंदिर बांधण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने आज मोठा निर्णय घेतला.

मुंबई  : अयोध्येमध्ये राम मंदिर बांधण्यासाठी  श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र या नावाने ट्रस्टची स्थापना करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी लोकसभेत केली. नरेंद्र मोदींच्या या निर्णयाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वागत केले असून संपूर्ण मंत्रिमंडळाचे अभिनंदन केले आहे. तसेच, या निर्णायामुळे अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीला आता वेग येईल अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. 

राज ठाकरे यांनी यांसदर्भात ट्विट केले आहे. ते म्हणाले, "केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज 'श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र' ह्या ट्रस्टच्या स्थापनेला मंजुरी दिली गेली. ह्या निर्णयामुळे अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीला आता वेग येईल अशी अपेक्षा. ह्या निर्णयासाठी संपूर्ण मंत्रिमंडळाचे मनापासून अभिनंदन."

दरम्यान, अयोध्येत राम मंदिर बांधण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने आज मोठा निर्णय घेतला. मंदिराच्या बांधणीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार ट्रस्टची स्थापना करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत केली. राम मंदिराच्या निर्मितीसाठी स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टचे नाव श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट असे ठेवण्यात आले आहे, अशी माहिती नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत दिली.

(पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितला राम मंदिराच्या बांधणीचा प्लॅन, लोकसभेत केली मोठी घोषणा )

याचबरोबर, आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत अयोध्येत राम मंदिर बांधण्याबाबत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. माझ्या नेतृत्वाखालील सरकारने रामजन्मभूमीवर भव्य मंदिर बांधण्यासाठी तसेच यासंबंधीच्या इतर विषयांवर देखरेख ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांनुसार एक व्यापक योजना तयार केली आहे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार श्रीरामजन्मभूमी ट्रस्ट या स्वायत्त ट्रस्टची स्थापना करण्याचा प्रस्ताव पारित करण्यात आला आहे, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

(राम मंदिरासाठी ट्रस्टची घोषणा करताच उद्धव ठाकरेंनी केले मोदींचे अभिनंदन)

 

टॅग्स :राज ठाकरेनरेंद्र मोदीमनसेराम मंदिर