Join us  

राज ठाकरे आणि पाकिस्तानचा संबंध काय? भाजपाने केला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 8:25 PM

कारण इम्रान खान यांनी जे पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल जे म्हटले त्याचा उल्लेख काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस करीत नाहीत. पण राज ठाकरे मात्र वारंवार करतात. त्यामुळे मनसेचे पाकिस्तानी कनेक्शन काही आहे का, हे एकदा तपासलंच पाहिजे असा टोला विनोद तावडेंनी लगावला.

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी फॉर न्यू इंडिया या फेसबुक पेजवरील कुटुंब व्यासपीठावर आणून मोदी है तो मुमकिन है या जाहिरातीची पोलखोल केली. भाजपाकडून खोट्या पद्धतीचा प्रचार सुरु असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. मात्र हे फेसबुक पेज आमच्याशी संबधित नाही. कारण ते फेसबुक पेज नॉन व्हॅरीफाईड आहे, अधिकृत फेसबुक पेज व्हॅरीफाईड असतं व त्या पेजला ब्ल्यू टीकमार्क असतो असं भाजपाकडून सांगण्यात आले.  

यावेळी तावडे यांनी सांगितले की, योगेश चिले आणि त्यांच्या कुटूं‍बीयांचा जो फोटो दाखविण्यात आला. तो फोटो संगोता मित्रा मुस्ताफी यांनी घेतला होता. त्या फोटोच्या आधारे एक बातमी करण्यात आली, ही बातमी मीट द अपवॉर्डली मोबाईल मिडल क्लास इंडियन..या मथळ्याखाली न्यूयॉर्क टाईम्स व पाकिस्तान डिफेन्स या वेबसाईटवर प्रसिध्द झाली आहे. त्या बातमीनुसार चिलेंनी मध्यम वर्ग बदलतोय आणि त्या परळच्या मध्यमवर्गीय कुटुंबाचा विकास कसा झाला अशा आशयाची ती बातमी आहे. ती न्यूयॉर्क टाईम्समध्ये छापली होती. न्यूयॉर्क टाईम्सच्या बातमीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता असल्याचा उल्लेखही आले. पाकिस्तान डिफेन्सच्या वेबसाईटवरही ही बातमी झळकवली आहे, कदाचित पाकिस्तान डिफेन्सचा यामध्ये संबंध नसेल पण पाकिस्तान आणि मनसेचं काय नातं आहे. कारण इम्रान खान यांनी जे पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल जे म्हटले त्याचा उल्लेख काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस करीत नाहीत. पण राज ठाकरे मात्र वारंवार करतात. त्यामुळे मनसेचे पाकिस्तानी कनेक्शन काही आहे का, हे एकदा तपासलंच पाहिजे असा टोला विनोद तावडेंनी लगावला.

हा फोटो ४-५ वर्षांपूर्वीचा आहे. कारण काल त्यांची कन्या ही स्टेजवर दिसली ती या फोटोपेक्षा मोठी झालेली आहे. असेही विनोद तावडे यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. आता नरेंद्र मोदी यांच्या पाठीराख्यांची शेकडो, हजारो फेसबुक पेजस आहेत. राज ठाकरे यांचेही दहा बारा फेसबुक पेजस आहेत. आता या सगळया राज ठाकरे यांची आहेत असे नाही. तर कोणी राज ठाकरे, कोणी ठाकरे राज, कोणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, कोणी राज साहेब ठाकरे अशा वेगवेगळी फेसबुक पेज आहेत व त्यावर वेगवेगळया गोष्टी पोस्ट असतात असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले असं विनोद तावडे यांनी सांगितले.  

टॅग्स :लोकसभा निवडणूकमनसेपाकिस्तानभाजपा