लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: महापालिका निवडणुकीला आगामी काळात कसे सामोरे जायचे याची माहिती योग्यवेळी देण्यात येईल. आपली तयारी पूर्ण असली पाहिजे यासाठी काय करावे लागेल, कोणते मुद्दे घेणार आहोत. निवडणूक कशी हाताळायची याची सर्व माहिती लवकरच दिली जाईल. परंतु, युतीबाबत किंवा अन्य निर्णयाबाबत कुठेही भाष्य करू नका, असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी पदाधिकाऱ्यांना दिले.
बोरिवली येथे पश्चिम उपनगरातील पदाधिकाऱ्यांच्या शिबिरात राज म्हणाले, निवडणूक कधीही लागू शकते त्यामुळे हा विषय गांभीर्याने घेण्याची गरज आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधणे हे सर्वांसाठीच बंद केले आहे. त्यामुळे कुणीही संवाद साधायचा नाही. कुणाकडे जाऊन त्यांना काय वाटते यापेक्षा मला काय वाटते? हे जास्त महत्त्वाचे आहे. प्रकृती खराब असल्याने जास्त बोलणार नाही. सर्दी खोकला आहे. शंका निर्माण करण्याऐवजी शिंकाच जास्त निर्माण होत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
सोमवारी सकाळी १० वाजता रंगशारदा येथे मुंबईतील पदाधिकाऱ्यांचा मेळावा आहे. या मेळाव्याला वेळेत हजर राहा. अशी विभागनिहाय शिबिरे घेण्यात येणार आहेत, असेही राज यांनी सांगितले.