मुंबई : मुंबईत विविध मागण्यांसाठी वारंवार आंदोलने झाली. मुंबई बंदही झाली. मात्र, शेतकऱ्यांच्या न्यायासाठीही मुंबईने आवाज उठवावा, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे बुधवारी केली.
कडू यांनी राज यांची शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली. यावेळी शेतकरी आत्महत्या, शेतमालाला मिळणारा कमी भाव, दिव्यांगांच्या समस्या यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यानंतर कडू म्हणाले, मराठवाड्यातील शेतकरी आंदोलनात राज यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवून या लढ्याला पाठिंबा देण्याची विनंती केली आहे. हे आंदोलन मर्यादित न राहता मुंबईनेही शेतकऱ्यांसाठी किमान अर्धा तास वेळ द्यावा.
सरकारी धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. पण शेतकऱ्यांसाठी लढणारे नेते राजकारणात दुर्लक्षित झाले आहेत. आम्ही उपेक्षितांच्या चुलीवर राजकारण करणारे नाही. शेतमालाला दर न मिळणे हे दुष्काळापेक्षाही गंभीर आहे; पण दुष्काळ पडला तरच कर्जमाफीचा विचार करू हे मुख्यमंत्री फडणवीस यांचे विधान दुर्दैवी आहे, अशी टीकाही करतानाच रक्षाबंधनाला आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील महिलांकडून सरकारला वेदनेची राखी बांधण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.