Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाळांतील विद्यार्थ्यांचा पावसाळा होणार सुकर, पालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विशेष तरतूद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2024 10:39 IST

शालोपयोगी वस्तूंमध्ये छत्रीचा समावेश.

मुंबई : मुंबई महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना यंदा पावसाळ्यापूर्वी छत्री मिळणार आहे. २०२४-२५ व २०२५-२६ या दोन शैक्षणिक वर्षांसाठी छत्री खरेदीचा निर्णय पालिकेच्या शिक्षण विभागाने घेतला आहे. यंदा शालेय उपयोगी २७ प्रकारच्या वस्तूंचा दोन वर्षांसाठी मोफत पुरवठा करण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात १६२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून छत्री खरेदीसाठी पहिल्या टप्प्यात एक कोटी ९१ लाख ५४ हजार ३०४ रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

मुंबई पालिका शाळांतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शिक्षण विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येतात. दप्तर, वह्या, पुस्तक, बूट, गणवेश, पाण्याची बाटली आदी २७ शालेय वस्तूंचे मोफत वाटप करण्यात येते. दरवर्षी शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप होते, अशी टीका पालिकेच्या शिक्षण विभागावर होते. त्यामुळे यंदा आतापासूनच शालेय वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. यात पुस्तक, बूट, गणवेश, पाण्याच्या बाटल्यांसाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. परंतु पावसाळ्यापूर्वी विद्यार्थ्यांना छत्रीचे वाटप केल्यास त्यांना पावसाळ्यात दिलासा मिळेल, असा विश्वास पालिकेच्या शिक्षण विभागाने व्यक्त केला.

विलंब होऊ नये म्हणून...

शालेय वस्तूंचे वाटप वेळेवर होत नसल्याने दरवर्षी पालिकेच्या शिक्षण विभागावर टीकेची तोफ डागली जाते. त्यामुळे शिक्षण विभाग आतापासून कामाला लागला असून २०२४-२५ आणि २०२५-२६ या शैक्षणिक वर्षांसाठी विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यासाठी त्यांची खरेदीचा निर्णय घेतला आहे. यासाठी निविदा मागवण्यात आल्या असून एक कोटी ९१ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. पालिका शाळांत विविध माध्यमांतील चार लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

मध्यान्ह भोजनासाठीही प्रक्रिया सुरू -

१)  शालेय वस्तूंसोबत २०२४-२५, २०२५-२०२६ आणि २०२६-२७ या तीन वर्षांत विद्यार्थ्यांना चविष्ट व पौष्टिक खिचडीचे वाटप करण्यासाठी निविदा मागवण्यात येणार आहे.

२) पुढील ८ ते १० दिवसांत निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. पालिका शाळांतील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना खिचडी वाटप करण्यात येते.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाशाळा