Join us

पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस

By सचिन लुंगसे | Updated: August 19, 2025 07:29 IST

सकाळीच विस्कळीत झालेली मुंबई पूर्व पदावर येण्यास संध्याकाळ उलटली

सचिन लुंगसे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: रेल्वेसह रस्ते वाहतुकीला ब्रेक लावणाऱ्या पावसाने मुंबईचे जनजीवन आठवड्याच्या पहिल्याच दिवशी विस्कळीत केले. पूर्व-पश्चिम द्रुतगती मार्गासह मध्य आणि हार्बरवर साचलेल्या पाण्यामुळे रस्ते, लोकल वाहतुकीचा खोळंबा झाला. लोकल पाऊण तास उशिराने धावत असल्याने चाकरमानी स्टेशनावर अडकून पडले. दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. परंतु, सकाळीच विस्कळीत झालेली मुंबई पूर्व पदावर येण्यास संध्याकाळ उलटली.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा जोर वाढल्याने हवामान खात्याने मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला. तत्पूर्वी सोमवारी पहाटेपासूनच संपूर्ण मुंबईत पडलेल्या पावसाने मुंबईकरांची झोप उडाली. सकाळी ८:३० ते १२:३० या वेळेत उपनगरात ठिकठिकाणी ७५ मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर भायखळ्यातील बावला कपाउंड, दादर टीटी, माटुंग्यातील गांधी मार्केट परिसरात साचलेल्या पाण्यामुळे या रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली होती. मुंबई-ठाण्याला जोडणाऱ्या एलबीएस मार्गावर कुर्ला डेपो, कुर्ला सिग्नल, कल्पना सिनेमा, शीतल सिग्नल आणि कमानी जंक्शनवर साचलेल्या पाण्यामुळे वाहने अडकून पडली होती. 

कुठे साचले पाणी, कुठे वाहतूक बंद

  • कांदिवली पोईसर सब वेमध्ये २ ते ३ फूट पाणी साचले, वाहतूक बंद 
  • काळबादेवी एस. व्ही. पी. रोडवर अर्धा फूट पाणी, वाहतूक धीम्या गतीने 
  • दिंडोशीमध्ये ओबेरॉय मॉलसमोर पाणी साचले, वाहतूक धीमी 
  • अँटॉप हिलमध्ये कल्पक नाका ते वसंतदादा पाटील चौक आणि सी. जी. एस. कॉलनी रस्त्यावर दोन फूट पाणी, वाहतूक बंद 
  • ट्रॉम्बे येथे मानखुर्द बोगद्यामध्ये दह ते पंधरा फूट पाणी, वाहतूक बंद
  • अँटॉप हिलमधील कानेनगर रोडवर दीड फूट पाणी, वाहतूक बंद 
  • बीकेसी कनेक्टरवर पाणी साचल्याने वाहतूक धीमी
  • चेंबूरमधील टिळकनगर टर्मिनस रोड आणि महापालिका शाळा परिसरात पाणी साचल्याने वाहतूक धीमी
  • चुनाभट्टीमधील सोमय्या कॉलेज आणि वडाळा जंक्शनवर पाणी साचले, रस्ता बंद
  • पूर्व द्रूतगती मार्गावर ट्रॉम्बे येथे दोन फूट पाणी साचले, वाहतूक धीमी 
  • ओशिवऱ्यातील वीरा देसाई रोडवर पाणी, वाहतूक बंद
  • हिंदमाता ब्रीजखाली भोईवाडा येथे दोन ते तीन फूट पाणी, रस्ता बंद 
  • सांताक्रूझमधील एस. व्ही. रोडवर पाणी, वाहतूक धीमी 
  • चुनाभट्टी एव्हरार्ड नगरमध्ये पाणी साचले, वाहतूक धीमी
  • वडाळा मोनोरेल स्टेशन, हरी मंदिर परिसरात २ फूट पाणी, वाहतूक बंद 
  • भायखळ्यात बावला कम्पाउंड येथे दीड फूट पाणी, वाहतूक धीमी 
  • गांधी मार्केट येथे अडीच ते तीन फूट पाणी भरल्याने वाहतूक बंद
  • दादर टीटी येथे दीड फूट पाणी, वाहतूक धीमी
  • अंधेरी सब वे येथे अडीच फूट पाणी, वाहतूक बंद

पूर्व-पश्चिम द्रूतगतीमार्ग ठप्प

चेंबूरमधल्या शेल कॉलनीमधील वस्तीत पाणी शिरण्यासह कुर्ला - अंधेरी रोडवरही मरोळ, साकीनाका परिसरात वाहतुकीचा खोळंबा झाला होता. पूर्व - पश्चिम द्रुतगती मार्गावर ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे हे मार्ग कोंडीत अडकले.

टॅग्स :पाऊसमुंबईचा पाऊस