The rains are over, however, waiting for the airport | पावसाळा उलटला, तरी वाहनतळाची प्रतीक्षा
पावसाळा उलटला, तरी वाहनतळाची प्रतीक्षा

मुंबई : बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये वन्य जिवांच्या अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रवेशद्वारापाशी वाहनतळ उभारण्यात आले आहे. हे वाहनतळ दिवाळीनंतर सुरू करण्याचे उद्यान प्रशासनाने सांगितले होते, पण अद्यापही या वाहनतळाचे १५
टक्के काम अपूर्ण आहे. त्यामुळे उद्यान प्रशासन आणि महाराष्ट्र
पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) तत्काळ हे वाहनतळ सुरू करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.
रिव्हर मार्चच्या वतीने २०११ साली उद्यानात सायकल प्रकल्प सुरू केला, परंतु त्याला पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. वाहनांच्या भरधाव वेगामुळे वन्य जिवांच्या अपघाती मृत्यूचे प्रमाणदेखील वाढत आहे. वाहनांमुळे वन्य जिवांचा अधिवास धोक्यात येऊ लागला आहे. देशासह विदेशातील विविध राष्ट्रीय उद्यानात खासगी वाहनांना बंदी आहे, परंतु मुंबईतल्या राष्ट्रीय उद्यानात वाहनांना बंदी नाही. वाहनांवर तोडगा काढण्यासाठी उद्यानाच्या प्रवेशद्वारापाशी खासगी वाहनांसाठी एक वाहनतळ असावे, अशी मागणी पर्यावरणप्रेमी व रिव्हर मार्च टीमच्या वतीने करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत प्रशासनाकडून वाहनतळ उभारण्यात आले.
रिव्हर मार्चचे सदस्य विक्रम चोगले म्हणाले की, नॅशनल पार्कचे वाहनतळाचे ८० टक्के काम होऊनदेखील दोन ते अडीच वर्षे धूळखात पडले आहे. नुकतेच उद्यान प्रशासनाच्या वनअधिकाऱ्यांनी वाहनतळाची पाहणी केली. एमटीसीडीतर्फे १४ इलेक्ट्रिक बसगाड्या आणल्या जाणार असून, पहिल्यांदा तात्पुरत्या स्वरूपात पाच इलेक्ट्रिक बसगाड्या त्वरित आणल्या जाणार आहेत आणि वाहनतळ सुरू केले जाणार आहे. वाहनतळ सुरू झाल्यावर वन्य जिवांना अपघात जाणार नाहक बळी, वाहनांची वेगमर्यादा आणि प्रदूषणाला आळा बसेल.
>नॅशनल पार्कच्या वाहनतळाचे ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. एमटीडीसी आणि वनविभागाच्या पुढाकाराने काम सुरू आहे. पुढील एक ते दोन महिन्यांत वाहनतळ सुरू होईल. इलेक्ट्रिक बसगाड्याही लवकरच उद्यानात दाखल होतील.
- अनवर अहमद, मुख्य वनसंरक्षक आणि संचालक, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान.
वाहनतळावर सौरऊर्जेचे दिवे बसवा
वाहनतळात सौरऊर्जावर चालणारे दिवे बसविण्यात यावेत, जेणेकरून विजेवर होणारा खर्च कमी होईल. म्हणून वाहनतळावर सौरऊर्जेचा प्लांट बसविण्याची मागणी वनविभागाकडे करण्यात आली आहे.

Web Title: The rains are over, however, waiting for the airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.