मुंबई : पावसाने शुक्रवारी लावलेल्या दमदार हजेरीमुळे मुंबई शहर आणि उपनगरातील अनेक भाग पाण्याखाली गेले. उपनगरातील अंधेरी, जोगेश्वरी भागात सकाळी सर्वाधिक पावसाची नोंद झाली. अडीच फुटापर्यंत पाणी साचल्यामुळे दुपारपर्यंत दोन वेळा अंधेरी सब-वे वाहतुकीसाठी बंद करावा लागला. त्यामुळे वाहतूक गोखले पुलावरून वळवण्यात आली. अंधेरी पश्चिमेतील मोगरा नाल्याची रुंदी बऱ्याच ठिकाणी कमी आहे. जोरदार पाऊस आणि त्याचवेळी भरतीची वेळ असल्यास या नाल्यातील पाण्याची पातळी वाढते. परिणामी अंधेरी सब वे, दाऊद बाग, आझादनगर, वीरा देसाई परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होते. हा परिसर बशीसारखा असल्यामुळे पाण्याचा निचराही होण्यास वेळ लागतो. त्यातच अंधेरी सब वे परिसरात मलनिस्सारणाचे पाणीही येत असल्यामुळे थोड्याशा पावसातही हा परिसर पाण्याखाली जातो. त्यामुळे वाहतूक बंद करावी लागते. गेल्या कित्येक वर्षांत पालिकेला यावर तोडगा काढण्यात यश आलेले नाही. दरम्यान, सब वेचा हा प्रश्न सोडवण्यासाठी उपाययोजनांची पडताळणी केली जात असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. परंतु, त्यासाठी विलंब होत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
५०० कोटी रुपयांहून अधिक खर्च अपेक्षितअंधेरी पूर्वेकडून पश्चिमेकडे येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे भुयारी मार्गात पाणी साचत असल्याची शक्यता आहे. पालिकेने पूर्वेकडील बाजूस जमिनीखाली किंवा इतर कोणत्याही मोकळ्या जागेवर किंवा रस्त्याच्या खाली भूमिगत टाकी बांधण्याचा पर्याय पालिकेपुढे आहे. या शिवाय मोगरा नाल्यात मलनिस्सारण वाहिन्यांमधील प्रवाह मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे हा नाला पावसाळ्यानंतरही वाहत असतो. केवळ ताशी २० मिमी पाऊस पडला, तरी येथे पाणी साचते. परिणामी ताशी ७५ मिमी पावसाच्या पाण्याचा निचरा करता येईल, अशा पद्धतीने या भागाचे नियोजन करावे लागणार आहे. मात्र, यासाठी जवळपास ५०० कोटी रुपयांहून अधिक खर्च अपेक्षित असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. हा खर्च व्यवहार्य आहे का, यावर नागरिक प्रश्न उपस्थित करत आहेत.
अंधेरी सब वे २०२४ च्या पावसाळ्यात २८ वेळा, २०२३ मध्ये २१ वेळा, तर यंदा आतापर्यंत १३ वेळा बंद ठेवावा लागला आहे.