दिवाळी-छटपूजेच्या गर्दीवर रेल्वेकडून ‘होल्डिंग एरिया’चा उतारा; प्रमुख स्टेशनमध्ये एका वेळी ४ हजार प्रवाशांसाठी सुविधा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 10:37 IST2025-10-09T10:37:47+5:302025-10-09T10:37:56+5:30
यंदा दिवाळी १८ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे, तर छटपूजा २५ ऑक्टोबरला साजरी होणार आहे.

दिवाळी-छटपूजेच्या गर्दीवर रेल्वेकडून ‘होल्डिंग एरिया’चा उतारा; प्रमुख स्टेशनमध्ये एका वेळी ४ हजार प्रवाशांसाठी सुविधा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दिवाळी आणि छटपूजेकरिता उत्तर प्रदेशसह विविध राज्यांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने क्राउड मॅनेजमेंटची तयारी सुरू केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी), मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनस येथे प्रवाशांसाठी तात्पुरते होल्डिंग एरिया उभारण्यात येत आहेत. प्रत्येक एरियात ३ ते ४ हजार प्रवाशांना एकाचवेळी थांबण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
यंदा दिवाळी १८ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे, तर छटपूजा २५ ऑक्टोबरला साजरी होणार आहे. त्याकरिता मुंबईतून नागरिक मोठ्या संख्येने गावी जाणार आहेत. त्यामुळे १४ ते २८ ऑक्टोबरदरम्यान प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढू शकते. त्या पार्श्वभूमीवर नियमित गाड्यांसह मध्य रेल्वेने एक हजार ६०० पेक्षा अधिक तर पश्चिम रेल्वेने एक हजार २०० पेक्षा जास्त दुतर्फा विशेष फेऱ्यांचे नियोजन केले आहे.
प्रवाशांसाठी सुविधा अशा...
होल्डिंग एरियाजवळ अतिरिक्त एटीव्हीएम मशीन बसवल्या जातील.
मोबाइल यूटीएस बुकिंगची सुविधा
पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि जनआहार केंद्र
लाइट, पंखे आणि विजेची जोडणी
सणांच्या पार्श्वभूमीवर आम्ही विशेष नियोजन केले आहे. यामध्ये विशेष ट्रेन, होल्डिंग एरिया, अतिरिक्त तिकीट बुकिंग
खिडक्या उपलब्ध करण्यात आल्या आहेत. प्रवाशांना योग्य दिशा दाखवण्यासाठी
लाउड स्पीकर आणि अतिरिक्त कर्मचाऱ्यांद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
- विनीत अभिषेक,
मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे
पोलिस, अतिरिक्त कर्मचारी, तिकीट तपासनीस तैनात
अनारक्षित तिकीट असलेले प्रवासी रेल्वे टर्मिनसवर ट्रेन पकडण्यासाठी येतात. त्यामुळे गर्दी वाढत जाते. ही गर्दी नियंत्रित ठेवण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी, तिकीट तपासणी अधिकारी, रेल्वे पोलिस आणि आरपीएफची विशेष पथके तैनात केली जाणार आहेत.
सीएसएमटी येथे पाच हजार चौरस मीटरहून अधिक जागेत नवीन होल्डिंग एरिया तयार केला जात आहे, तर एलटीटीमध्ये गेल्या वर्षीप्रमाणेच होल्डिंग एरिया ठेवण्यात येणार आहे.
पश्चिम रेल्वेने वांद्रे टर्मिनसमध्ये नवीन होल्डिंग एरियाचे बांधकाम सुरू केले असून, ते या आठवड्यात पूर्ण होईल. यासह याच ठिकाणी रनिंग रूमसमोर तात्पुरती व्यवस्था केली जाणार आहे.
प्रवाशांची सुविधा लक्षात घेऊन जनआहार आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासह एक हजारपेक्षा जास्त कर्मचारी देखील आम्ही तैनात करणार आहोत.
- डॉ. स्वप्नील निला,
मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे
मर्यादेपेक्षा अधिक सामान असल्यास दंडाचा बडगा
मर्यादेपेक्षा अधिक तसेच मोठ्या आकाराच्या पिंपासारखे अवजड सामान प्रवासी डब्यातून नेताना कुणी आढळल्यास त्यांच्यावर डब्याच्या वर्गानुसार दंड आकारले जाणार आहे.