रेल्वेचा फुकट्या प्रवाशांना दणका; २६ कोटी दंड वसूल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 12:56 IST2026-01-08T12:56:56+5:302026-01-08T12:56:56+5:30
नऊ महिन्यांत पकडले २१ लाख ५४ हजार प्रवासी

रेल्वेचा फुकट्या प्रवाशांना दणका; २६ कोटी दंड वसूल
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : उपनगरी रेल्वे गाड्यांमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने एप्रिल ते डिसेंबर २०२५ दरम्यान तिकीट तपासणी मोहीम राबवली. या नऊ महिन्यांच्या कालावधीत दोन्ही रेल्वे मार्गावर २१ लाख ५४ हजार फुकटे प्रवासी पकडले असून, त्यांच्याकडून ९६ कोटी रुपयांपेक्षा अधिक दंड वसूल करण्यात आला.
मध्य रेल्वेच्या मुंबई उपनगरी विभागात तिकीट तपासणीदरम्यान एकूण १२ लाख ८२ हजार विनातिकीट प्रवासाची प्रकरणे उघडकीस आली. या प्रकरणांतून ५५ कोटी १३ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. विशेष तपास पथके, अचानक तपासणी आणि गर्दीच्या वेळेत वाढवलेली देखरेख, यामुळे ही कारवाई प्रभावी ठरल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरी विभागात याच कालावधीत आठ लाख ७२ हजार फुकटे पकडले असून, त्यांच्याकडून ४१ कोटी २६ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. नियमित तपासणीमुळे केवळ महसूल वाढलेला नाही, तर वैध तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हितही जपले जात असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
एप्रिल ते डिसेंबर २०२५ दरम्यानची कारवाई
मध्य रेल्वे : १२ लाख ८२ हजार फुकट्या प्रवाशांकडून ५५.१३ कोटी रुपये वसूल.
पश्चिम रेल्वे : ८ लाख ७२ हजार ११६ फुकट्यांकडून ४१.२६ कोटी रुपये वसूल.
एकूण वसुली : ९६ कोटी रुपये