मान्सूनचा सामना करण्यासाठी रेल्वे सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:07 AM2021-05-14T04:07:13+5:302021-05-14T04:07:13+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाची मान्सूनची पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण होत आली आहेत. लॉकडाऊन ...

Railways ready to face monsoon | मान्सूनचा सामना करण्यासाठी रेल्वे सज्ज

मान्सूनचा सामना करण्यासाठी रेल्वे सज्ज

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाची मान्सूनची पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण होत आली आहेत. लॉकडाऊन काळात लोकल सेवा बंद असल्याने काम करणे रेल्वे प्रशासनाला सोयीस्कर गेले असून, मान्सून सामना करण्यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज झाले आहे.

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल यांनी रेल्वे बोर्डात असताना २०१९ मध्ये घाटांची पाहणी केली असताना त्यांनी घाटातील असुरक्षित ठिकाणी वेगवेगळ्या उपाययोजना करण्याच्या सूचना सुचविल्या. यामध्ये दक्षिण-पूर्व घाटातील पठाराला कायम ठेवण्यासाठी काही ठिकाणी कॅनेडियन कुंपण घालणे, वायर नेट व स्टील बीममधून पडणाऱ्या दगडाला रोखणे, रुळांवर जास्त पाणी येऊ नये यासाठी नाल्याची भिंत उंचावणे, आदी कामे सुरू आहेत. मध्य रेल्वेच्या कुर्ला ते विद्याविहार स्थानकादरम्यान सूक्ष्म बोगद्याद्वारे १.८ मीटर व्यास आणि दोनशे मीटर लांबीचे पाच पाईप्स टाकले गेले आहेत. पनवेल आणि कर्जत, वडाळा आणि रावळी, टिळक नगर, बदलापूर आणि वांगणी दरम्यान विद्यमान पुलाला लागून आरसीसी बॉक्स टाकून जलमार्ग वाढविण्यात आला आहे.

राज्य शासनाच्या मदतीने मायक्रो-टनेलिंगद्वारे सँडहर्स्ट रोड येथे १.८ मीटर व्यास आणि ४०० मीटर लांबीचा पाईप, मस्जीद स्थानक येथे १ मीटर व्यास आणि ७० मीटर लांबीच्या पाईपला सूक्ष्म बोगद्याद्वारे जमिनीखालून टाकण्यात आले. चिन्हांकित ठिकाणी पंपांची संख्या आणि क्षमता वाढविण्यात आली आहे. मोठ्या पाण्याचा प्रवाह त्वरित वाहून नेण्यासाठी, पावसाळ्याच्या काळात ट्रॅकवर पाणी राहू नये आणि रेल्वेची वाहतूक विस्कळीत होऊ नये, यासाठी हेवी ड्युटी पंप देण्याचीही रेल्वेने योजना आखली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत पंपांची संख्या १० टक्के वाढविली जाणार आहे. तसेच रेल्वे सुरक्षा दलाच्या क्विक रिॲक्शन टीम आणि फ्लड रेस्क्यू टीमने एनडीआरएफकडून प्रशिक्षण घेतले आले. कोणत्याही परिस्थितीतील बचावासाठी पाच यांत्रिकीकृत बचाव नौका सामरीकरीत्या ठेवण्यात आल्या आहेत.

नियंत्रण कक्षाला वेळेवर माहिती मिळण्यासाठी आरपीएफ कर्मचाऱ्यांकडून ड्रोनद्वारे मॉनिटरिंग करण्यात येईल, तर मागील वर्षी ज्या भागात पाणी साचण्याच्या समस्या झाल्या त्या भागात यावर्षी अतिरिक्त सुविधा पुरवून नवीन उपाययोजना राबविण्याचा मानस पश्चिम रेल्वे प्रशासनाने केला आहे. मान्सूनमध्ये लोकल सेवा ठप्प होऊ नये, यासाठी विशेष कामे पश्चिम रेल्वे प्रशासनाद्वारे केली जात आहेत. रेल्वे स्थानकातील नाल्याची सफाई करण्यात येत आहे. पाण्याचा उपसा करण्यासाठी पंपाची व्यवस्था केली जाणार आहे. यासह इतर आवश्यक बाबीची पूर्तता यावेळी केली जाणार आहे. भुयारी गटारे आणि नाल्यांची खोली वाढविण्याचे आणि साफसफाईची कामे हाती घेतली जाणार आहेत, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिली.

...........................................

Web Title: Railways ready to face monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.