AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 11:44 IST2025-05-16T11:32:06+5:302025-05-16T11:44:41+5:30
मुंबई लोकलमधून रेल्वे कर्मचारी असल्याचं सांगून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. याचीच प्रचिती देणारी एक घटना मध्य रेल्वेवरील एसी लोकलच्या प्रवासात समोर आली आहे.

AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
मुंबई लोकलमधून रेल्वे कर्मचारी असल्याचं सांगून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. याचीच प्रचिती देणारी एक घटना मध्य रेल्वेवरीलएसी लोकलच्या प्रवासात समोर आली आहे. एसी लोकलमध्ये तिकीट तपासण्यासाठी चढलेल्या टीसीने इतर प्रवाशांचे तिकीट तपासले पण काहींनी आपण स्टाफ असल्याचं सांगताच त्यांचं तिकीट तपासलं गेलं नाही. याचा जाब एका प्रवाशानं तिकीट तपासनीसांना विचारता त्यांनी संबंधित प्रवाशांचं ओळखपत्र आणि तिकीट तपासण्याऐवजी प्रवाशालाच उलट उत्तर दिलं. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत असून तिकीट तपासनीसांची मग्रुरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
एसी लोकलचं तिकीट एकतर सर्वसामान्य लोकलपेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. त्यात जर रेल्वेचे कर्मचारी असल्याचं सांगून असा विनातिकीट प्रवास होत असेल तर नियम फक्त सर्वसामान्य नागरिकांनाच आहेत का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी सायंकाळी ५.१२ च्या दादर अंबरनाथ एसी लोकलमध्ये घडली आहे. या लोकलमध्ये प्रवाशांचे तिकीट तपासण्यासाठी ४ टीसी चढले. प्रवाशांनी तिकीट दाखवण्यास सुरुवात केली. पण सीटवर बसून आरामात प्रवास करणाऱ्या चार ते पाच जणांनी स्टाफ असल्याचं सांगताच तिथे उपस्थित असलेल्या टीसीने त्यांच्याजवळील तिकीट किंवा पास तपासला नाही. विशेष म्हणजे त्यापैकी एकाच्या खिशात NRMU चं कार्ड होतं. हे पाहून तिथं उपस्थित एका प्रवाशानं या प्रवाशांचे तिकीट का तपासले नाहीत? असा जाब टीसीला विचारला. तर टीसीनं या प्रवाशांचे तिकीट तपासण्याचे सोडून प्रवाशालाच उलट उत्तर दिलं. घटनेचं व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केल्यानंतर टीसीने संबंधितांचे तिकीट तपासण्यास सुरुवात केल्याचं प्रवासी व्हिडिओत म्हणताना दिसतो. NRMU कार्ड खिशात ठेवून त्यातील एक जण प्रवास करतोय असं म्हटलं असता त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी करुनही टीसीनं कारवाई करण्याची तसदी घेतली नाही.
पात्र नसलेले रेल्वे कर्मचारी आपल्या आयकार्डच्या जीवावर बिनदिक्कतपणे एसी किंवा फर्स्टक्लासमधून प्रवास करताना दिसतात. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. यासंबंधीच्या अनेक तक्रारी देखील याआधीही समोर आल्या आहेत. यावर आता मध्य रेल्वे प्रशासन कडक कारवाई करणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.