मुंबई : ब्रिटनमधील किंग्ज क्रॉस स्टेशनच्या धर्तीवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)चा पुनर्विकास करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, त्याचे आतापर्यंत १८ टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पासाठी १ हजार ८०० कोटी रुपये खर्च होणार आहे. यामुळे सीएसएमटी केवळ ऐतिहासिक वास्तू न राहता, आधुनिक ‘रेल मॉल’ म्हणून नावारूपाला येईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
सीएसएमटी स्थानक मध्य रेल्वेचे मुख्यालय असून, महत्त्वाचे टर्मिनस आहे. आधुनिक ‘रेल-ओ-पोलिस’ या संकल्पनेवर आधारलेले केवळ प्रवासासाठी नव्हे तर खरेदी, जेवण आणि मनोरंजनाचे केंद्र म्हणून त्याचा विकास केला जाणार आहे.
स्थानकात एकाच छताखाली खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, वातानुकूलित प्रतीक्षा कक्ष, व्यवसाय केंद्र विविध सुविधा उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पात सीएसएमटी स्थानकाला नव्या मेट्रो स्टेशनशीदेखील जोडण्याची योजना आखण्यात आली आहे.
डीएन रोडच्या बाजूला एक एलिव्हेटेड डेक तयार केला जात असून, त्यावर फूड स्टॉल्स, तिकीट काउंटर, एटीव्हीएम आणि बसण्याची जागा असेल. पुनर्विकासाकरिता डीएन रोडवरील प्रशासकीय इमारतीचा तळमजला आणि दोन मजले ताब्यात घेणार असून, तेथील कार्यालये अन्यत्र हलविण्यात आली आहेत.
१,७०० गाड्यांचे पार्किंग
डेकवर १०० लिफ्ट, ७५ एस्केलेटर आणि १० ट्रॅव्हलेटर बसवले जात असून, ही यंत्रणा सीएसएमटीसारख्या व्यस्त स्थानकाला अधिक गतिशील बनवणार आहे. त्यासोबतच १,७०० गाड्या सामावून घेणारे अत्याधुनिक पार्किंग सुविधादेखील उभारली जाणार आहे.
मोठा एलिव्हेटेड डेक
तसेच डीआरएम कार्यालय प्लॅटफॉर्म क्रमाक १८च्या पुढे असलेल्या वाडी बंदर येथे नेण्यात येणार आहे. या कार्यालयाच्या जागेवर एक मोठा एलिव्हेटेड डेक तयार करण्यात येणार आहे.
जो नंतर स्थानकातील संपूर्ण उपनगरीय रेल्वे प्लॅटफॉर्मला जोडण्यात येईल. कर्नाक आणि वाडीबंदर जवळ पी. डीमेलो रोडच्या टोकावर आणखी एक एलिव्हेटेड डेक बांधण्यात येणार आहे.
हा डेक लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या प्लॅटफॉर्मला जोडला जाईल. सध्याच्या फूट ओव्हर ब्रीज व्यतिरिक्त २५ मीटर रुंद पादचारी पूल उभारण्यात येणार आहे. जे. जे. कॉलेज ऑफ आर्टच्या बाहेरील हिमालय पूल देखील एलिव्हेटेड डेकशी जोडला जाणार आहे.