Join us
Daily Top 2Weekly Top 5

"रिझर्वेशन देऊनही काही जण डबे बदलतात"; गोरखपूरसाठी कोकण रेल्वेच्या मार्गात बदलल करण्यावरुन ठाकरेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 23:32 IST

रेल कामगार सेनेच्या २४ व्या वार्षिक अधिवेशनात बोलताना उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका केली.

Uddhav Thackeray: हल्ली रिझर्वेशन देऊन सुद्धा अनेक जण डबे बदलतात. ज्यांना उद्दिष्ट नाही त्यांच्या गाड्या भरकटतात असा टोला उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवरही  निशाणा साधला. दिल्लीमध्ये बसलेले फक्त दिल्लीपुरतं बघतात. गोरखपूरला रेल्वे न्यायची तर न्या, पण आमची कोकण रेल्वे वळवू नका असा इशारा सुद्धा उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला दिला. दोन दिवसांपूर्वी सादर झालेल्या मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पावरही उद्धव ठाकरेंनी भाष्य केले.

रेल कामगार सेनेच्या २४ व्या वार्षिक अधिवेशनाला उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी ते बोलत होते. मागे दोनदा मी तुमच्या कार्यक्रमासाठी आलो होतो मी पुन्हा येईन असं म्हणणार नाही पण नेहमी येत राहील, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मुंबई महानगरपालिका आता श्रीमंत पालिका राहिलेली नाही. मुंबई पालिकेने इतकी देणी करून ठेवली आहेत की पुढच्या २३ वर्षांमध्ये ही ती चुकवता येणार नाहीत, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. 

"कट्टर शिवसैनिकांनी कधी काय दिलं नाही दिलं याची पर्वा केलेली नाही. कारण आताचा जमाना असा आहे की पक्षात येण्याआधी रिझर्वेशन हवं असतं. रिझर्वेशन असेल तर मी पक्षात येतो आणि जरा कुठे काही खूट्ट झालं की रिझर्वेशन दिलेलं असलं तरी लोक डबे बदलतात, गाड्या बदलतात," असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

"पूर्वी रेल्वे खात्याचा एक अर्थसंकल्प येत होता पण हे सरकार आल्यापासून एक एक संस्था मारून टाकण्याचे काम सुरू आहे रेल्वेचा अर्थसंकल्प मुख्य अर्थसंकल्पात एकत्र केला. दिल्लीमध्ये बसलेले फक्त दिल्लीपुरतं बघतात. आता त्यांनी आपली ट्रे गोरखपूरला रेल्वे न्यायची असा निर्णय घेतला आहे. पण आमची हक्काची कोकण रेल्वे वळवून नेणार असाल तर आम्ही पेटून उठायचं नाही तर काय करायचं. सुरतला जाणारी ट्रेन बंद केली पाहिजे कारण त्याचा वाईट अनुभव आम्हाला आला आहे. रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला भरपूर आल्याचे म्हणतात. पण ते जनतेच्या वाटेला पोहोचतं की ना हा प्रश्न महत्त्वाचा आहे," असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

"मुंबई महापालिका ही कदाचित जगातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका होती. ती सुद्धा यांनी आता भीकेला लावली आहे. वाईट एवढ्या गोष्टीचं वाटतं की कष्ट करून तोट्यात असलेली मुंबई महानगरपालिकेच्या मुदत ठेवी वाढवत नेल्या. ९२ हजार कोटींपर्यंतच्या मुंबई महापालिकेच्या ठेवी होत्या. आता त्या ८० हजार कोटींपर्यंत आल्या आहेत. यासह अडीच लाख कोटींची देणी यांनी करून ठेवली आहेत. आता एवढं देणं यांनी मुंबई महापालिकेच्या डोत्यावर करुन ठेवलं आहे पुढची २३ वर्षे ही देणी आपण देत राहू," असेही उद्धव ठाकरे म्हणाले.  

टॅग्स :उद्धव ठाकरेभारतीय रेल्वेमुंबई महानगरपालिका