Join us  

निरुपम यांच्या उमेदवारीचा अंतिम निर्णय आता राहुल गांधी घेणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 11:35 AM

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उमेदवारीचा अंतिम निर्णय आता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी घेणार आहेत. उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून संजय निरुपम यांना उमेदवारी देण्यास देवरा व कामत गटाचा कडाडून विरोध आहे.

ठळक मुद्देमुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उमेदवारीचा अंतिम निर्णय आता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी घेणार आहेत. उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून संजय निरुपम यांना उमेदवारी देण्यास देवरा व कामत गटाचा कडाडून विरोध आहे.काँग्रेसच्या राष्ट्रीय निवडणूक समितीचा देखील निरुपम यांच्या नावाला विरोध आहे.

मनोहर कुंभेजकर

मुंबई - मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उमेदवारीचा अंतिम निर्णय आता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी घेणार आहेत. उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून संजय निरुपम यांना उमेदवारी देण्यास देवरा व कामत गटाचा कडाडून विरोध आहे. निरुपम यांना येथून तिकीट देऊ नये अशी भूमिका माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा यांनी घेतली असून त्यांनी दक्षिण मुंबईतून त्यांचा प्रचार गेले 5 दिवस थांबवलेला आहे.

काँग्रेसच्या राष्ट्रीय निवडणूक समितीचा देखील निरुपम यांच्या नावाला विरोध आहे. या समितीतील अहमद पटेल, के. सी, वेणूगोपाळ,आणि काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी देखील मुंबई काँग्रेसमधून निरुपम यांना तिकीट देण्यास काँग्रेसमधील अंतर्गत विरोध असल्याचा अहवालत्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना दिला आहे.तर येथून काँग्रेसचे माजी मंत्री कृपाशंकर सिह यांच्या उमेदवारीच्या नावाला येथून पसंती दिली आहे .त्यामुळे निरुपम यांच्या उमेदवारीबाबतचा काँग्रेसच्या राष्ट्रीय निवडणूक समितीचा अहवाल राहुल गांधी यांनी राखून ठेवला असून निरुपम यांना उत्तर पश्चिम  लोकसभा मतदार संघातून उमेदवारी द्यायची की, त्यांना परत त्यांच्या पूर्वीच्या उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून उमेदवारी द्यायची याबाबत अंतिम निर्णय राहुल गांधी घेणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी लोकमतशी बोलताना दिली.

शुक्रवारी (22 मार्च) दुपारी दिल्लीत काँग्रेसच्या राष्ट्रीय निवडणूक समितीची बैठक झाली. यावेळी महाराष्ट्रातील 5 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली. मात्र मुंबईतील उत्तर पश्चिम व उत्तर मुंबई या दोन लोकसभा मतदार संघातील काँग्रेसच्या उमेदवारांचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे राहुल गांधी यांनी निरुपम यांच्या उमेदवारीचे सर्व अधिकार आपल्याकडे घेतले असून याबाबत त्यांना उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून की उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून उमेदवारी द्यायची की नाही याचा अंतिम निर्णय राहुल गांधी घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुकवारी जाहीर केलेल्या शिवसेनेच्या 21 उमेदवारांच्या यादीत परत उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांना येथून उमेदवारी दिली आहे. निरुपम यांना उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून जर तिकीट मिळाल्यास त्यांची थेट लढत युतीचे उमेदवार व शिवसेनेचे विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांच्या बरोबर होणार आहे. मात्र निरुपम यांच्या विरोधात कमालीचा नाराज असलेला कामत व देवरा गट निरुपम यांच्या प्रचारात उतरून एकदिलाने काम करतील का अशी शंका काँग्रेसच्या सूत्रांनी शेवटी व्यक्त केली. 

टॅग्स :संजय निरुपमराहुल गांधीलोकसभा निवडणूककाँग्रेस