Join us
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर येणार, 'मविआ'च्या कामाची माहिती घेणार; नाना पटोलेंची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2022 05:54 IST

काँग्रेस नेते, खा. राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्याची तारीख निश्चित झालेली नाही.

मुंबई :काँग्रेस नेते, खा. राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्याची तारीख निश्चित झालेली नाही. महाविकास आघाडीचा महाराष्ट्रातील किमान समान कार्यक्रम, सरकारमधील समन्वय यासाठी राहुल गांधी यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण असणार आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी सांगितले. या दौऱ्यात ते काँग्रेसचे आमदार, मंत्री आणि पक्ष पदाधिकाऱ्यांना भेटतील, असेही पटोले यांनी सांगितले.

नाना पटोले म्हणाले की, अखंड भारताचे स्वप्न पुढील १०-१५ वर्षांत पूर्ण होईल, हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेले वक्तव्य नवे नाही. तो आरएसएसचा अजेंडा आहे. केंद्रात आरएसएसच्या विचारांचे सरकार आल्यापासून देशभर विष कालवून समाज तोडण्याचे काम सुरू आहे. अशा पद्धतीने देश तोडून अखंड भारत कसा साकार होईल, असा प्रश्नही पटोले यांनी उपस्थित केला आहे.

वीज समस्येवर पटोले म्हणाले की, केंद्र सरकारकडून कोळसा पुरवठा होत नसल्याने विजेचे संकट ओढवले आहे. त्यावर केंद्रीय कोळसामंत्र्यांनी विदेशातून कोळसा आयात करण्याचा सल्ला दिला. कोळसा आयात केला, तर त्याचा फायदा भाजपच्या काही उद्योगपती मित्रांनाच होणार आहे. परंतु कोळसा आयात केल्याने वीज महाग होऊन त्याचा भुर्दंड मात्र सामान्य वीज ग्राहकांना सोसावा लागेल. पक्षांचे पोळी भाजण्याचे काम मशिदीवरील लाऊडस्पिकरचा मुद्दा उपस्थित करून काही राजकीय पक्ष आपली पोळी भाजण्याचे काम करत आहेत. सर्वच धर्मामध्ये लाऊडस्पिकर वापरला जात असताना एकाच धर्माला टार्गेट का केले जात आहे. महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे, असे पटोले म्हणाले.

 

टॅग्स :राहुल गांधीनाना पटोलेकाँग्रेस