Join us  

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना प्रियांका, राहुल गांधींची आदरांजली, संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2024 7:40 AM

सोनिया गांधींसह चार राज्यांचे मुख्यमंत्री, देशभरातील नेते आज शिवाजी पार्कवर

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी मणिपूरपासून सुरू केलेल्या भारत जोडो न्याय यात्रेच्या सांगतेनंतर रविवारी शिवाजी पार्क येथे जाहीर सभा होणार आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी  सभेला उपस्थित राहणार आहेत. सभेत इंडिया आघाडीच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळही फोडला जाणार असून घटक पक्षांचे प्रमुख नेतेही उपस्थित असतील.

राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा १४ जानेवारीला इम्फाळमधून सुरू झाली. १६ राज्ये, ११० जिल्हे व ६,७०० किलोमीटरची यात्रा करत मुंबईत शनिवारी चैत्यभूमीवर यात्रेचा समारोप झाला.

रविवारच्या सभेसाठी महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी पवार गटही आपली ताकद लावणार आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार, मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड, काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी शनिवारी दुपारी शिवाजी पार्क येथे सभेच्या तयारीची पाहणी केली आणि आवश्यक सूचना केल्या.

शरद पवार, उद्धव ठाकरेही सभेत मार्गदर्शन करणार

शिवाजी पार्कवरील सभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन, हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या, एमडीएमकेचे वायको, शेकापचे जयंत पाटील, अपना दलच्या कृष्णा पटेल तसेच तृणमूल काँग्रेस, आप आणि माकपचे प्रतिनिधी या सभेला उपस्थित राहणार आहेत.

मणिभवनपासून आज पदयात्रा

  • राहुल गांधी रविवारी सकाळी ८:३० वाजता मुंबईत पदयात्रा काढणार आहेत. महात्मा गांधींचे वास्तव्य असलेल्या मणिभवनपासून ते ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत न्याय संकल्प पदयात्रा काढण्यात येईल. 
  • यात सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रांतील मान्यवर सहभागी होणार आहेत. त्यानंतर तेजपाल सभागृहात राहुल गांधी संवाद साधणार आहेत.

प्रकाश आंबेडकर यांना सभेचे निमंत्रण

मुंबईत रविवारी शिवाजी पार्कवर होणाऱ्या यात्रेच्या समारोप सभेचे निमंत्रण वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आले आहे. त्यांच्यासोबत जागा वाटपाची चर्चा सुरू असून तो प्रश्न मार्गी लावू, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. 

सामूहिक बुद्धवंदना, लेझर शोही पाहिला

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची शनिवारी चैत्यभूमीवर सांगता झाली. यावेळी राहुल गांधी यांनी चैत्यभूमीवर घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासोबत प्रियांका गांधी याही उपस्थित होत्या. राहुल यांच्यासह मान्यवरांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले.

धारावीतील स्वागतानंतर राहुल गांधी सायंकाळी उशिरा दादर येथील चैत्यभूमीवर गेले. यावेळी मुंबई काँग्रेसकडून चैत्यभूमी परिसरात राहुल आणि प्रियांकाचे जोरदार स्वागत करण्यात आले. चैत्यभूमीवर भन्ते बी. संघपाल महाथेरो यांनी सामूहिक बुद्धवंदना घेतली. त्यानंतर राहुल आणि प्रियांका यांनी अशोकस्तंभ भीम ज्योतीजवळ भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक  वाचन केले. त्यानंतर त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर व्हीबींग डेकवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संविधान सभेतील भाषणे आणि देशभक्तीपर गीतांवर आधारित लेझर शो करण्यात आला. या शोला भेट देऊन झाल्यावर राष्ट्रगीताने राहुल गांधी यांच्या यात्रेची सांगता करण्यात आली.

टॅग्स :राहुल गांधीप्रियंका गांधीडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीकाँग्रेस