Join us
Daily Top 2Weekly Top 5

Rahul Gandhi: राहुल गांधी अन् रावणात बरंच साम्य, भाजप खासदाराचा पटोलेंवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2022 11:18 IST

राजस्थानचे आरोग्य मंत्री परसादी लाल मीणा यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची तुलना भगवान राम (Lord Ram) यांच्याशी केली होती

मुंबई - महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी प्रभू श्री राम आणि राहुल गांधी यांच्यातील साम्य सांगितले होते. नाना पटोले म्हणाले की, 'राहुल आणि राम या दोघांचे नाव 'रा' ने सुरू होणे हा योगायोग आहे. पण, काँग्रेस राहुल गांधींची तुलना भगवान रामाशी करत नाही. भाजपची लोक करतात. राहुल गांधी हे माणूस आहेत आणि ते मानवतेसाठी काम करत आहेत.' नाना पटोले यांच्या विधानानंतर आता भाजप नेते आणि खासदार अनिल बोंडे यांनी पटोलेंवर पलटवार केला आहे. राहुल गांधी आणि रावणात बरच साम्य आहे, असेही बोंडे यांनी म्हटले. 

राजस्थानचे आरोग्य मंत्री परसादी लाल मीणा यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची तुलना भगवान राम (Lord Ram) यांच्याशी केली होती. 'राहुल गांधी प्रभू रामापेक्षा जास्त पदयात्रा करत आहेत', असे ते म्हणाले होते. त्यानंतर, मीणा यांच्या एक पाऊल पुढे जाऊन नाना पटोलेंनी श्रीराम आणि राहुल गांधी यांच्यातील साम्य सांगितलं. आता, अनिल बोंडे यांनी राहुल गांधींची तुलना रावणाशी केली आहे.  

राहुल गांधी आणि रावणात बरच साम्य आहे. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा उत्तरेकडून दक्षिणेकडे जात नाही आहे. दक्षिणेकडून उत्तरेकडे जात आहे. प्रभू राम  यांनी उत्तरेकडून दक्षिणेकडे यात्रा केली होती. विशेष म्हणजे ज्या लोकांनी भारत तोडण्याची शपथ घेतली होती, त्यांच्या गळ्यात गळे घालण्याच काम या यात्रेत राहुल गांधी करत आहेत, अशी टीकाही बोंडे यांनी केली आहे. नाना पटोले यांना अजून राम समजलेला नाही, असंही ते म्हणाले. 

नाना पटोले काय म्हणाले?

नाना पटोले म्हणाले की, भगवान श्रीरामही (पदयात्रा) कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत चालले होते, शंकराचार्यही त्याच मार्गाने चालले होते. आता राहुल गांधीही पदयात्रेत त्याच मार्गावर आहेत. त्यांच्या पदयात्रेत लोक सहभागी होत आहेत. त्यामुळे प्रभू राम आणि राहुल गांधी या दोघांचे नाव "रा" ने सुरू होणे, ही योगायोगाची गोष्ट नाही. पण आम्ही राहुलची तुलना प्रभू रामाशी करत नाही, भाजपची लोक त्यांच्या नेत्यांची तुलना देवाशी करतात. ते देव आहेत आणि राहुल गांधी माणूस आहेत. ते मानवतेसाठी काम करत आहे,' असं पटोले म्हणाले. 

राजस्थानच्या आरोग्यमंत्र्यांनी केली रामाशी तुलना

यापूर्वी राजस्थानचे मंत्री परसादी लाल मीणा यांनी राहुल गांधी हे प्रभू रामापेक्षा जास्त चालत असल्याचे म्हटले होते. श्रीराम अयोध्येपासून श्रीलंकेपर्यंत जेवढे पायी चालत गेले, त्यापेक्षा जास्त प्रवास राहुल गांधी करणार आहेत, असे मीणा म्हणाले होते. काँग्रेस नेत्यांच्या या वक्तव्यावर भाजपने तीव्र आक्षेप घेतला आहे. राजस्थानमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया म्हणाले की, राहुल गांधी हे भगवान रामापेक्षा मोठे कसे असू शकतात? काँग्रेस नेत्यांनी नेहमीच देव निवडण्यात चूक केली आहे.  

टॅग्स :नाना पटोलेराहुल गांधीअनिल बोंडे