Join us
Daily Top 2Weekly Top 5

...तर त्वरित कोरोना चाचणी करून घ्या; महापालिका प्रशासनचे मुंबईकरांना आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2021 20:51 IST

मुंबईत सध्या पाच हजार १७ सक्रिय रुग्ण आहेत.

मुंबई - मागील काही दिवसांपासून बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ दिसून येत आहे. अद्याप कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका नसला तरी सण-उत्सव सुरु असल्यामुळे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाधित रुग्णांचे त्वरित निदान होऊन प्रसार रोखण्यासाठी मुंबईत २६० कोविड विनामूल्य चाचणी केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. बाधितांच्या संपर्कातील, लक्षणे असलेले व बाहेरगावहून आलेल्या व्यक्तीने तात्काळ चाचणी करावी, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. 

मुंबईत सध्या पाच हजार १७ सक्रिय रुग्ण आहेत. लसीकरण मोहीम वेगाने सुरु असल्याने मुंबईत कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आहे. नवरात्रौत्सवात बाधित रुग्ण बाधित रुग्ण वाढ असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे २६० चाचणी केंद्रांवर कोविड चाचणी मोफत करण्यात येते आहे. त्या केंद्रांचे पत्ते महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. पालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये कार्यरत असणाऱ्या नियंत्रण कक्षांशी संपर्क साधल्यास नजीकच्या चाचणी केंद्राचा पत्ता मिळू शकतो. 

मार्च २०२० पासून आतापर्यंत कोविड चाचण्यांनी एक कोटींचा टप्पा पार केला आहे. निदान लवकर झाल्यास संबंधित व्यक्तीचे विलगीकरण करता येते. ज्यामुळे बाधित व्यक्तीपासून इतरांना बाधा होण्यास प्रतिबंध होतो. हीच बाब प्रामुख्याने लक्षात घेऊन कोविड विषयक चाचणी करून घेण्याबाबत पालिकेमार्फत जनजागृती सुरु आहे. महापालिकेची रुग्णालये, दवाखान्यांमध्ये कोविड चाचणी केंद्रे आहेत. तसेच इतर खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये देखील या चाचण्या निर्धारीत शुल्क आकारून करण्यात येत आहेत. या सर्व चाचण्यांचे निकाल २४ तासांच्या आत केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर 'अपलोड' करणे गरजेचे आहे.

नागरिकांनी मास्क वापरणे, सुरक्षित आंतर राखणे आणि वारंवार हात साबणाने स्वच्छ धुवून घ्यावेत. कोविड चाचणी वेळेत झाल्यास बाधित व्यक्तीला वेळेवर उपचार मिळण्यासह त्यांच्यापासून इतरांना संसर्ग होण्यास प्रतिबंध होऊ शकेल. - सुरेश काकाणी ( अतिरिक्त महापालिका आयुक्त)

यांनी काळजी घ्या...

ज्येष्ठ नागरिक (सहव्याधी असलेले)फुफ्फुसांचे आजार, हृदयविकार, यकृत विकार, मूत्राशयाचे आजार, मधुमेह, मेंदूविकार, रक्तदाब) अशा व्यक्तींनी आणि प्रसूतीकाळ नजीक असलेल्या गर्भवती माता, डायलिसिस रुग्ण, कर्करूग्ण.

दररोजची सरासरी चाचणी - ३५ ते ४० हजारआतापर्यंत - एक कोटी सहा लाख ५२ हजार ६४ 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई महानगरपालिका