एप्रिलमध्ये १२ हजार मालमत्तांची खरेदी; सरकारच्या तिजोरीत ९९० कोटी रुपयांचा महसूल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 10:16 IST2025-05-01T10:15:46+5:302025-05-01T10:16:58+5:30
एकीकडे मालमत्तांच्या विक्रीमध्ये वाढ झाली असली तरी गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा एप्रिलमध्ये महसूलात मात्र ६ टक्क्यांची घट नोंदवली गेली आहे.

एप्रिलमध्ये १२ हजार मालमत्तांची खरेदी; सरकारच्या तिजोरीत ९९० कोटी रुपयांचा महसूल
मुंबई : शहरातील मालमत्ता खरेदीचा जोर कायम असून, एप्रिलमध्ये मुंबईत एकूण १२ हजार १४१ मालमत्तांची खरेदी झाली आहे. यापोटी राज्य सरकारच्या तिजोरीत ९९० कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. गेल्यावर्षीच्या एप्रिल महिन्याच्या तुलनेत यंदा ४ टक्के अधिक व्यवहार झाले आहेत. गेल्यावर्षी एप्रिलमध्ये ११ हजार ६४८ मालमत्तांच्या खरेदीचे व्यवहार झाले होते.
एकीकडे मालमत्तांच्या विक्रीमध्ये वाढ झाली असली तरी गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा एप्रिलमध्ये महसूलात मात्र ६ टक्क्यांची घट नोंदवली गेली आहे. गेल्यावर्षी या महिन्यात मालमत्तांच्या व्यवहारातून सरकारला एक हजार ०५८ कोटींचा महसूल मिळाला होता.
एप्रिल महिन्यात ज्या मालमत्तांच्या खरेदीचे व्यवहार झाले आहेत, त्यामध्ये ८० टक्के प्रमाण हे निवासी मालमत्तांचे आहे. उर्वरित २० टक्के मालमत्ता या कार्यालयीन तसेच व्यावसायिक स्वरूपाच्या आहेत. ज्या मालमत्तांची किंमत दोन कोटी किंवा त्यापेक्षा अधिक आहे, अशा मालमत्तांच्या खरेदीचे प्रमाण हे २५ टक्के आहे. गेल्या वर्षी एप्रिलच्या तुलनेत यामध्ये ३ टक्के वाढ नोंदवली आहे.
द. मुंबईत मागणी नाही
एप्रिलमध्ये झालेल्या मालमत्ता खरेदीमध्ये मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात सर्वाधिक ८५ टक्के व्यवहार झाले आहेत. मध्य आणि दक्षिण मुंबईत मात्र यंदा केवळ एक टक्का व्यवहारांची नोंद झाली आहे. पश्चिम उपनगरात ग्राहकांनी सर्वाधिक पसंती ही वांद्रे, खार, जुहू, अंधेरी, मालाड, कांदिवली व बोरीवलीला दिल्याचे दिसून आले.