Join us  

पुरंदरे यांची शिवसृष्टी उभारू देणार नाही; जितेंद्र आव्हाडांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2018 8:13 AM

१९७६पासून पुरंदरे शिवसृष्टीसाठी पैसे जमवत आहेत.

मुंबई : बाबासाहेब पुरंदरे यांची शिवसृष्टी आम्हाला मान्य नाही. मराठी मनाला मान्य होईल अशी शिवसृष्टी उभी राहिली पाहिजे. राज्य सरकारने पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला असला तरी त्यांच्या शिवसृष्टी प्रकल्पासाठी ३०० कोटींचा निधी आम्ही देऊ देणार नाही. इतिहासाला साजेशी शिवसृष्टी निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने एक समिती नेमायला हवी. पुरंदरे यांची शिवसृष्टी उभी राहू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी दिला.मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत आव्हाड यांनी पुणे जिल्ह्यातील प्रस्तावित शिवसृष्टीस तीव्र विरोध असल्याचे जाहीर केले. या वेळी इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे उपस्थित होते. १९७६पासून पुरंदरे शिवसृष्टीसाठी पैसे जमवत आहेत. यासाठी त्यांनी कोट्यवधी रुपयांच्या जमिनीही जमा केल्या आहेत. इतक्या वर्षांत या प्रकल्पासाठी जमा केलेल्या पैशाचा हिशेब द्यावा. हा वैचारिक लढा असून आम्ही पुरंदरे यांची शिवसृष्टी उभी राहू देणार नाही. त्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र देऊ, राज्यपालांची भेट घेऊ आणि जनमत तयार करू, असे आव्हाड यांनी सांगितले. एक शिवप्रेमी आणि राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून माझी ही भूमिका आहे. यापूर्वीही शिवसन्मान जागर परिषदेत मी हीच भूमिका मांडली होती, असे आव्हाड यांनी स्पष्ट केले.तर, पुरंदरे यांच्या खासगी संस्थेला निधी देण्याऐवजी सरकारने स्वत:च शिवसृष्टी निर्माण करावी, अशी मागणी श्रीमंत कोकाटे यांनी केली. पुरंदरे यांनी जातीयवादी विष पेरण्याचेच काम केले. जिजाऊ आणि शिवरायांची बदनामी केली. पुरंदरे यांच्या शिवसृष्टीला ३०० कोटी देणे बदनामी करण्यासाठी दिलेली बक्षिसी आहे का, असा सवाल कोकाटे यांनी उपस्थित केला. राज्य सरकारने स्वत:ची सर्वसमावेशक शिवसृष्टी तयार करावी, असेही कोकाटे म्हणाले.

पुरंदरेंनी स्वखर्चाने शिवसृष्टी उभारावी: राधाकृष्ण विखे -पाटीलपुरंदरे यांच्याकडून उभारल्या जात असलेल्या शिवसृष्टीला 300 कोटी  रूपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्यास आमचा विरोध आहे. पुरंदरेंनी स्वखर्चाने शिवसृष्टी उभारावी आणि सरकारने इतिहास संशोधकांची समिती नेमून स्वतंत्र शिवसृष्टी उभारावी, असे विखे-पाटील यांनी सांगितले. 

टॅग्स :जितेंद्र आव्हाडबाबासाहेब पुरंदरेराष्ट्रवादी काँग्रेसहिंदुइझम