न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा; सीसीटीव्हीमुळे फुटली वाचा; आजही अनेक प्रकरणे पुराव्याअभावी कारागृहाच्या चौकटीआड बंद
By मनीषा म्हात्रे | Updated: January 30, 2025 07:30 IST2025-01-30T07:29:40+5:302025-01-30T07:30:05+5:30
अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिस संशयाच्या घेऱ्यात अडकले आहेत.

न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा; सीसीटीव्हीमुळे फुटली वाचा; आजही अनेक प्रकरणे पुराव्याअभावी कारागृहाच्या चौकटीआड बंद
मनीषा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : चित्रपट, मालिकांमध्ये अनेकदा पोलिस एखाद्या सर्वसामान्याला खोट्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी स्वतःच पुरावे पेरताना दिसतात. वास्तवात यापूर्वी अशाच प्रकारच्या घडलेल्या घटनांचे प्रतिबिंब यात उमटत असते. अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिस संशयाच्या घेऱ्यात अडकले आहेत.
सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी संशयित म्हणून आकाश कनोजियाला ताब्यात घेतले गेले. कारवाईचे श्रेय घेण्याच्या धडपडीत दुर्ग येथील आरपीएफने त्याच्या फोटोसह माहितीची प्रेसनोट शेअर केली. ‘तो मी नाही’ हे वारंवार सांगून देखील पोलिसांनी कनोजियाकडे दुर्लक्ष केले. कनोजियाच्या अटकेची बातमीही वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. विविध माध्यमांवर देखील त्याचेच फोटो झळकत होते. पुढे, मोहम्मद शरिफुल शहजाद हाती लागल्यानंतर त्याला सोडण्यात आले.
या चौकशीबरोबर सैफ अली खानचा हल्लेखोर म्हणून लागलेल्या टॅगने त्याची नोकरी गेली. ठरलेले लग्न मोडल्याने आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचा आरोप तो करत आहे. दुसरीकडे, सैफ अली खान प्रकरणात सीसीटीव्हीमध्ये दिसणारा आरोपी माझा मुलगा नाही. माझ्या मुलाला खोट्या गुन्ह्यात अडकविल्याचा आरोप शरिफुलच्या वडिलांनी केला आहे. मात्र, तोच खरा आरोपी असून, त्याच्याविरुद्ध भक्कम पुरावे असल्याचे अपर पोलिस आयुक्त परमजितसिंह दहिया यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्ट केले. याच्या तपासात पुढे काय येते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
२०२१ मुंबई पोलिस दलाची प्रतिमा धुळीस मिळवणाऱ्या अँटीलिया स्फोटके आणि व्यावसायिक मनसुख हिरेन हत्याप्रकरणाने सर्वांनाच हादरवून सोडले. मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानी स्फोटकांची भरलेली कार उभी करून जिवाला धोका असल्याचे चित्र निर्माण केले.
२०१३ जागा मालकाच्या तक्रारीवरून वांद्रे पोलिसांनी कलिना येथील २० वर्षीय तरुणाला खोट्या ड्रग्जच्या गुन्ह्यात अडकविले होते. मात्र, चौकशीत जागा मालक जे. सी. डिसुझाचा हा सर्व प्रताप उघडकीस येताच पोलिसांवरही कारवाई करण्यात आली.
मे २०२२ दोघांनी आपल्यावर बलात्कार केल्याच्या तरुणीच्या फिर्यादीवरून धारावी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. तरुणीने सांगितलेल्या वर्णनावरून दोनशेहून अधिक सीसीटीव्हींच्या माध्यमातून तपासाअंती पोलिसांनी दोन्ही आरोपींना शोधले. अटकेनंतर पोलिसांच्या दबावापोटी आरोपींनीही न केलेल्या गुन्ह्याची कबुलीसुद्धा दिली. मात्र, एका कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्याच्या चाणाक्षपणामुळे तरुणांनी पोलिसांच्या दबावापोटी न केलेल्या बलात्काराची दिलेली कबुली समोर आली. अनिल चव्हाण (१९) आणि नीलेश चव्हाण (२०) या दोन भावांना पोलिसांनी बलात्काराच्या गुन्ह्यात अटक केली होती. त्यानंतर त्यांना सोडण्यात आले.
ऑगस्ट २०२४ खारमधील चार पोलिसांनी तबेला मालक शाहबाज खानला अडकविण्यासाठी त्याच्या मित्राच्याच खिशात ड्रग्जची पुडी ठेवून बेकायदेशीररीत्या ताब्यात घेतले. एवढेच नाहीतर, तबेला मालकाविरुद्ध जबाब देण्यासाठी दबावही वाढवला. मात्र, गोठ्यातील सीसीटीव्हीने खाकीमागच्या या चेहऱ्यांचा पर्दाफाश केला आणि अवघ्या काही तासांतच निर्दोष डॅनियल इस्टीबेरो यांची सुटका झाली.
२०२१ मध्ये पत्नीचा पाठलाग करणारा तसेच पोलिस खबरी असलेल्या एकाने माटुंगा येथील ३३ वर्षीय तरुणाच्या घरात ड्रग्ज असल्याची टीप देत स्वतः ड्रग्ज आणि रिव्हॉल्व्हर ठेवल्याचे समोर आले होते. शाहूनगर पोलिसांनी या टीपच्या आधारे कारवाई केली. या घटनेचे सीसीटीव्ही समोर आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.