Pune ISIS module case NIA arrests 2 accused: राष्ट्रीय तपास यंत्रणेने (ANI) बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेच्या स्लीपर मॉड्यूलशी संबंधित दोन फरार आरोपींना अटक केली. २०२३ मध्ये पुण्यात IED (स्फोटक यंत्र) तयार करणे आणि चाचणी करणे या संदर्भात ही अटक करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळावरून अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख अब्दुल्ला फयाज शेख उर्फ डायपरवाला (Abdullah Faiyaz Shaikh aka Diaperwala) आणि तल्हा खान अशी झाली आहे. दोघेही जकार्ता (इंडोनेशिया) येथे लपले होते. शुक्रवारी रात्री ते भारतात परतत असताना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-२ वर इमिग्रेशन ब्युरोने त्यांना थांबवले आणि ताब्यात घेतले. यानंतर, NIAच्या पथकाने त्या दोघांना ताब्यात घेतले आणि अटक केली, असे तपास यंत्रणेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
दोघेही दोन वर्षांहून जास्त काळ फरार
दोन्ही आरोपी दोन वर्षांहून अधिक काळ फरार होते आणि मुंबईतील NIAच्या विशेष न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट देखील जारी केले होते. NIAने दोन्ही आरोपींवर प्रत्येकी ३ लाख रुपयांचे रोख बक्षीसही जाहीर केले होते. निवेदनात असेही म्हटले आहे की, हे प्रकरण या आरोपींनी रचलेल्या गुन्हेगारी कटाशी संबंधित आहे. तसेच ISISशी संबंधित पुणे 'स्लीपर सेल'च्या आठ इतर सदस्यांना आधीच अटक करण्यात आली आहे. ते आधीपासूनच तुरुंगात आहेत.
देशविरोधी कारवाया केल्याचा आरोप
NIAने म्हटले आहे की, या आरोपींनी भारतातील शांतता आणि सौहार्द बिघडवण्याच्या उद्देशाने दहशतवादी कारवाया करण्याचा कट रचला होता. आरोपींनी ISISच्या अजेंड्यानुसार हिंसाचार आणि दहशतवादाच्या माध्यमातून देशात इस्लामिक राजवट प्रस्थापित करण्यासाठी भारत सरकारविरुद्ध युद्ध पुकारण्याचा कट रचला होता.
पुण्यात भाड्याने घर घेऊन बनवला 'बॉम्ब'
पुण्यातील कोंढवा येथे अब्दुल्ला फयाज शेख याने भाड्याने घेतलेल्या घरात IED बनवण्यात हे दोघे जण सहभागी होते. २०२२-२३ या कालावधीत, आरोपींनी या ठिकाणी बॉम्ब बनवणे आणि प्रशिक्षण देण्याशी संबंधित कार्यशाळेचे आयोजन केले आणि त्यात भाग घेतला. याव्यतिरिक्त, त्यांनी तयार केलेल्या IEDची चाचणी घेण्यासाठी नियंत्रित स्फोट देखील केला.
इतर कुणाला अटक?
तपास एजन्सीने सांगितले की, अब्दुल्ला फयाज शेख आणि तल्हा खान यांच्याशिवाय या प्रकरणात मोहम्मद इम्रान खान, मोहम्मद युनूस साकी, अब्दुल कादिर पठाण, सिमाब नसिरुद्दीन काझी, झुल्फिकार अली बडोदावाला, शमिल नाचन, आकीफ नाचन आणि शाहनवाज आलम अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.