महाराष्ट्रातील चित्रकरण स्थळांची माहिती असलेल्या स्पॉटलाईटचे प्रकाशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2017 19:57 IST2017-11-28T19:57:29+5:302017-11-28T19:57:46+5:30

महाराष्ट्रातील चित्रकरण स्थळांची माहिती असलेल्या स्पॉटलाईटचे प्रकाशन
मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांनी महाराष्ट्रात रोवली. आजही जास्तीत जास्त चित्रपट, मालिका, जाहिराती यांची निर्मिती मुंबईत होताना दिसते. या करिता चित्रीकरणाच्या आवश्यक त्या सोयी-सुविधाही महाराष्ट्रात विकसीत झाल्या. महाराष्ट्राला समृध्द असा नैसर्गिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक परंपरांचा वारसा लाभला आहे. मात्र याचा चित्रिकरणाच्या दृष्टीने पुरेपूर क्षमतेने वापर होताना दिसून येत नाही. या करिता शासनाने, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या माध्यमातून १०० महत्वाच्या चित्रिकरण स्थळांची माहितीपुस्तिका तयार केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख् उपिस्थितीत या माहिती पुस्तिकेचे (स्पॉटलाईट) प्रकाशन आज मंत्रालयात करण्यात आले. या प्रसंगी पर्यटन मंत्री जयकुमार रावले उपस्थित होते. याप्रसंगी दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज उपस्थित होत्या.
सदर माहितीपुस्तिकेची १३ स्थळ प्रकारात (Categories) विभागणी केली असून त्यात समुद्र किनारे, गडकिल्ले, गुहा, धबधबे, जंगल, खेळ,साहस, धार्मिक, ऐतिहासिक स्थळे-स्मारके, संग्रहालये इत्यादींचा समावेश आहे. तसेच या प्रत्येक स्थळाचा सविस्तर तपशील, नकाशातील स्थान व ऐतिहासिक महत्व तसेच हवामान, दळणवळण, चित्रिकरणासाठीचा संपूर्ण तपशील उपलब्ध सोयी सुविधा इ. बाबींचा समावेश करण्यात आला आहे.
सदर माहितीपुस्तिकेतील स्थळांची आकर्षक छायाचित्रे, माहिती व इतर तपशील यामुळे ही पुस्तिका जगभरातील महाराष्ट्रात चित्रिकरणासाठी उत्सुक निर्माते व निर्मिती संस्थांकरिता एक रेडी रेकनर म्हणून उपयुक्त ठरेल अशी आशा आहे. या माहितीपुस्तिकेमुळे जगभरात महाराष्ट्र हे एक 'चित्रपट स्नेही' राज्य म्हणून नावारुपास येण्यास निश्चितच सहाय्य होईल.