Join us  

'बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला फाशीच्या शिक्षेची तरतूद करा'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 12:10 PM

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे मनसेच्या शिष्टमंडळाला आश्वासन

ठळक मुद्देदरम्यान, यावेळी गृहमंत्र्यांनी शक्ती कायद्यातील तरतुदीनुसार बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची तरतूद करण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती दिली.

मुंबई - साकीनाका येथील 34 वर्षीय महिलेवर झालेल्या अमानुष बलात्काराच्या घटनेनंतर आणि राज्यात वाढत असलेल्या महिला अत्याचारांच्या घटनेतील वाढ पाहता  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या  सरचिटणीस शालिनी ठाकरे यांच्यासह शिष्टमंडळाने काल राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. तसेच आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांना सादर केले. 

यात प्रामुख्याने बलात्काराच्या घटनांची प्रकरणे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणे, महिलांवरील अत्याचाराचे एफआयआर घटनेनंतर 24 तासात नोंदवून घेणे, राज्य महिला आयोगाला  तात्काळ पूर्णवेळ अध्यक्ष मिळावा, बलात्कार करणाऱ्या आरोपीला तत्काळ फाशी देण्याची तरतूद शक्ती कायद्यात करावी त्यासाठी शक्ती कायद्याची राज्यात लवकरात लवकर अंमलबजावणी करावी, पोस्को कायद्यातील पळवाटा दूर कराव्यात, महिलांविषयक प्रकरणांचा स्वतः गृहमंत्र्यांनी दर महिन्यातून एकदा आढावा घ्यावा अशी आग्रही मागणी करण्यात आली.

दरम्यान, यावेळी गृहमंत्र्यांनी शक्ती कायद्यातील तरतुदीनुसार बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची तरतूद करण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती दिली. तसेच महिला अत्याचाराच्या प्रकरणांचा महिन्यातून एकदा गृहमंत्री स्वतः आढावा घेणार असल्याचे आश्वासन त्यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला दिल्याची माहिती शालिनी ठाकरे यांनी लोकमतला दिली. तसच या सर्व विषयावर मनसेच्या शिष्टमंडळाला त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली तसेच काही मुद्द्यावर आपले म्हणणे विस्तृतरित्या सादर करण्यास सांगितले. यावेळी शालिनी ठाकरे यांच्यासह जनहित व विधी कक्षाचे सरचिटणीस ऍड.संतोष सावंत , गोरेगाव महिला विभाग अध्यक्षा धनश्री नाईक उपस्थित होते. 

टॅग्स :मनसेदिलीप वळसे पाटील