- सचिन लुंगसे मुंबई - मुंबई शहर आणि उपनगरात ठिकठिकाणी मुसळधार पावसाची हजेरी लागत असतानाच दुसरीकडे 'एक मराठा, लाख मराठा' या घोषणांचा मुंबईच्या लोकलमध्ये शुक्रवारी अक्षरशः पाऊस पडला. आझाद मैदानातील मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी बहुतांश मराठा आंदोलक सकाळपासूनच मैदानात दाखल होत असतानाच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आंदोलकांनी भरून वाहत होते. सकाळपासून सुरू असलेला आंदोलकांचा उत्साह रात्री उशिरापर्यंत भर पावसात कायम होता.
मुंबईच्या लोकलची पीक अवरची सकाळची गर्दी कमी होत असतानाच कर्जत, कसाऱ्यापासून आंदोलक लोकल मार्गाने मैदान गाठत होते. दुपारी १२ पर्यंत पावसाचा जोर कमी होता. दरम्यानच्या काळात बऱ्यापैकी आंदोलकांनी मैदान गाठले होते, तर दुपारी ३ वाजेपर्यंत मैदानाकडील आंदोलकांचा ओघ सुरूच होता. मोठ्या पावसातही न थकता आंदोलक मैदान गाठल्यानंतर परतीच्या मार्गावरही सीएसएमटीवर घोषणांचा पाऊस पाडत होते. आझाद मैदानासह लगतच्या परिसरात धो-धो पाऊस कोसळत असतानाच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा संपूर्ण परिसर आंदोलकांनी व्यापून टाकला होता.
परतीचा प्रवासकुर्ला रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ८ वर दुपारी ३ वाजताच परतीच्या मार्गासाठी आंदोलक दाखल झाले होते.तर, सीएसएमटीकडे जाण्याऱ्या लोकलमधून दुपाराचे दोन वाजले तरी आंदोलक घोषणा देत प्रवास करत होते.
लेझीमच्या तालावर ठेकासीएसएमटीच्या इंडीकेटर परिसरात प्रवाशांऐवजी आंदोलकांचा भरणा अधिक होता. हार्बर फलाटासमोरील जागेत आंदोलकांनी हलगी वाजवित लेझीमच्या तालावर ठेका धरला होता. हे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. सेल्फी काढण्यापासून प्रत्येक क्षण मोबाइलमध्ये कैद करण्यासाठी प्रवाशांचीही गर्दी होती.
चटणी आणि भाकरीजलद आणि धिम्या लोकलच्या १ मथल्या फलाटावर बार्शीहून आलेल्या आंदोलकांनी जेवणाचा बेत मांडला होता. रिंगण तयास करून आंदोलक भाकरी, चटणी, कांदा आणि मिरचीवर ताव मारत होते.ठिकठिकाणी आंदोलन विश्रांतीसाठी २ पहुडले होते. दिवसभर सीएसएमटी परिसरात भगव्या टोप्या, शेले घातलेले आंदोलक उपस्थित असल्याने परिसर भगवामय झाला होता.