Join us

मराठा आंदोलन: शिंदे गटाचे अर्जुन खोतकर आझाद मैदानात, घेतली मनोज जरांगेंची भेट; म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 14:25 IST

Manoj Jarange Patil Protest For Maratha Reservation In Mumbai: यावर लवकरच तोडगा निघेल, असा विश्वास अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केला.

Manoj Jarange Patil Protest For Maratha Reservation In Mumbai: मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईत सुरू केलेले उपोषण सोमवारीही कायम आहे. मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी डॉक्टरांचे एक पथक आझाद मैदानावर आले.  या पार्श्वभूमीवर मुंबईत अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. शिवसेना शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर यांनी आझाद मैदानात जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.

मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी मुंबईत मोठ्या प्रमाणावर मराठा आंदोलक जमले आहेत. सीएसएमटी स्थानक परिसर, मंत्रालयासह अनेक भागांत मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. पाच दिवसांच्या गणपती बाप्पांना निरोप दिल्यानंतर हजारो चाकरमानी मुंबईत आपापल्या कामावर परतत आहेत. यामुळे गर्दीत भर पडत असून, अनेक ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसत आहे. 

आमदार अर्जुन खोतकर यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट

मी पक्षाचा नेता किंवा सरकारमधील सदस्य म्हणून आझाद मैदानात आलेलो नाही. माणुसकी म्हणून या ठिकाणी आलेलो आहे. मी सर्वच लोकांना भेटी देतो. तसेच इथे भेटायला आलो आहे. मी कोणाचाही निरोप घेऊन आलेलो नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत शंभर टक्के सकारात्मक आहेत. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी होतील. आरक्षण मागण्याचा अधिकार त्यांचा आहे. सरकारने सहकार्य केले पाहिजे. यावर लवकरच तोडगा निघेल, असा विश्वास अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केला.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. आंदोलन वाढत चालले आहे तसे मराठा आंदोलकांची गर्दीही वाढत आहे. पाच दिवसांच्या गणपती बाप्पांना निरोप दिल्यानंतर हजारो चाकरमानी मुंबईत आपापल्या कामावर परतत आहेत. यातच मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हजारो मराठा आंदोलक मुंबईत आले आहेत. लोकलमधील प्रवाशांना गर्दीतून वाट काढून देण्यासाठी पोलीस यंत्रणा काम करत आहेत. मराठा आरक्षणासंदर्भातील सरकारसोबतची चर्चा अद्याप निष्फळ ठरत असल्याने आंदोलन अधिक तीव्र होत चालले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मंत्रालय परिसरातील काही रस्ते पोलिसांनी वाहतुकीसाठी बंद केले आहेत. त्याचबरोबर मोठा पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. 

 

टॅग्स :अर्जुन खोतकरमनोज जरांगे-पाटीलमराठा आरक्षणशिवसेना