मुंबई : मोबाइल अॅपच्या माध्यमातून अवैधरित्या बेटिंग खेळाची सेवा देणाऱ्या परिमॅच अॅपप्रकरणी ईडीने दि. १२ ऑगस्ट रोजी केलेल्या छापेमारीदरम्यान एकूण ११० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. दि. १२ ऑगस्ट रोजी ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुंबईसह देशात एकूण १७ठिकाणी छापेमारी केली होती. या छापेमारी दरम्यान कंपनीच्या विविध बँक खात्यात असलेली ११० कोटी रुपयांची रक्कम, शेकडो डेबिट कार्ड आणि डिजिटल उपकरणे ईडीच्या अधिकाऱ्यांनी जप्त केली आहेत.
सर्वसामान्य ऑनलाइन खेळांसाठी भरगोस बक्षिसांचे प्रलोभन दाखवत त्यांना या अॅपमध्ये पैसे भरण्यासाठी प्रवृत्त करत कालांतराने त्या पैशांचा अपहार कंपनीने केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सायप्रस देशातील या कंपनीने याप्रकरणी तीन हजार कोटी रुपयांचा घोटाळा करत मनी लॉड्रिंग केल्याचे निदर्शनास आल्यानंतर ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. याच तपासाचा भाग म्हणून ही छापेमारी करत आतापर्यंत बँक खात्यातील ११० कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत.