पाच वॉर्डांत ८९९ कोटींची मालमत्ता कर थकबाकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 13:03 IST2025-01-16T13:03:13+5:302025-01-16T13:03:25+5:30
उत्पन्नवाढीसाठी झोपडपट्ट्यांमधील व्यावसायिक गाळेधारकांकडून मालमत्ता कर आकारण्यासाठी पालिकेने सर्वेक्षण सुरू केले आहे.

पाच वॉर्डांत ८९९ कोटींची मालमत्ता कर थकबाकी
मुंबई : मुंबई महापालिकेची एकूण पाच हजार कोटी रुपयांची मालमत्ता कर थकबाकी असून, त्यापैकी तब्बल ८९९ कोटींचा कर पाच विविध वॉर्डांतील मोठे व्यावसायिक आणि बिल्डरांनी थकवला आहे. मात्र, थकबाकी वसुलीसाठी महापालिका त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाही. या उलट २०० कोटी रुपयांच्या महसूल वाढीसाठी झोपडपट्ट्यांमधील छोटे व्यावसायिक आणि दुकानदारांकडून मालमत्ता कर वसूल करत आहे, अशी टीका मुंबई भाजपचे उपाध्यक्ष रवी राजा यांनी आयुक्त भूषण गगराणी यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.
उत्पन्नवाढीसाठी झोपडपट्ट्यांमधील व्यावसायिक गाळेधारकांकडून मालमत्ता कर आकारण्यासाठी पालिकेने सर्वेक्षण सुरू केले आहे. वॉर्डस्तरावर सर्वेक्षण करताना गाळेधारकांकडे कागदपत्रे मागितली जात आहेत. दुकानाच्या क्षेत्रफळाची माहिती मिळताच रेडीरेकनर दरानुसार मालमत्ता कराचे देयक गाळेधारकांच्या हाती सोपविले जात आहे. मात्र, रवी राजा यांनी या निर्णयाला विरोध केला असून, त्यांनी आयुक्तांना पत्र लिहून ही कार्यवाही रद्द करण्याची मागणी केली आहे.
वॉर्ड मालमत्ता कर थकबाकी (रु.)
ए वॉर्ड ३१०,६७,१८,१३६
एल वॉर्ड ३६४,५२,९९,६३५
एफ उत्तर १२४,३५,४५,०५०
जी दक्षिण ५०,२३,१३,१८९
एच पश्चिम ४९,५२,७८,६८४
हे आहेत कर थकबाकीदार
राजा यांनी दिलेल्या यादीत एलआयसीची अडीचशे कोटी रुपये थकबाकी आहे. डीबीएस रिएलिटी, कमला मिल आणि एमएसआरडीसी यांनीही कर थकवल्याचे म्हटले आहे.
महसूल वाढीसाठी महापालिका उत्पन्नाचे विविध स्रोत शोधत आहे. मात्र, अनेक मोठे व्यावसायिक, आस्थापनांकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकी असून, त्याच्या वसुलीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत. आवश्यकता असल्यास थकबाकीदारांची संपत्तीही जप्त करावी; पण फक्त २०० कोटी रुपयांसाठी गरीब मुंबईकरांना त्रास देऊ नये, अशी विनंती आयुक्तांना केली आहे.
रवी राजा, उपाध्यक्ष, मुंबई भाजप