मुंबई : एचयूएफ कंपनीला १३९ कोटी रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी कंपनीच्या दोन माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी निगडित ठिकाणी छापेमारी करत त्यांची २६ कोटी ३० लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये २४ अचल मालमत्तांचा समावेश आहे. कंपनीत केलेल्या घोटाळ्याच्या पैशांतून त्यांनी या आरोपींनी ही मालमत्ता खरेदी केल्याचा ठपका ईडीने त्यांच्यावर ठेवत ही जप्तीची कारवाई केली आहे.
सुनील कुमार गर्ग (कंपनीचा माजी व्यवस्थापकीय संचालक) आणि निखिल अगरवाल (माजी मुख्य वित्तीय अधिकारी) अशी या दोन आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरोधात कंपनीच्या विद्यमान व्यवस्थापकीय संचालकांनी चाकण येथे पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात मनी लॉण्ड्रिंग झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
व्यापाऱ्यांकडून घेतलेले पैसे वैयक्तिक नावावर वळवले
या दोन्ही अधिकाऱ्यांनी संगनमत करत कंपनीच्या व्यवहाराच्या बनावट नोंदी केल्या, तसेच बनावट पावत्या तयार केल्या, तसेच कंपनीला सेवा पुरवठा करणाऱ्या काही व्यापाऱ्यांना व्यवहार झाल्याची नोंद करत त्यांना पैसे दिले आणि हेच पैसे या व्यापाऱ्यांकडून वैयक्तिक नावावर वळवून घेतल्याचे ईडीच्या तपासात दिसून आले.
अशा पद्धतीने व्यवहार न केल्यास या व्यापाऱ्यांना कंपनीच्या व्यवहारातून वगळले जाईल, अशी धमकीदेखील त्यांनी व्यापाऱ्यांना दिल्याचे तपासात निष्पन्न झाले. यापूर्वी ४ नोव्हेंबर २०२४ रोजी ईडीने या दोन्ही आरोपींची १० कोटी १५ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली.