Join us

किल्ल्यांवर दारूबंदी; कारावास अन् दंड! सुधीर मुनगंटीवार यांची माहिती,  हेरिटेज मार्शल नेमणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 06:41 IST

राज्यातील ३८७ संरक्षित स्मारकांना सुमारे ५१३ कोटींचा निधी देण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई:गडकिल्ल्यांवर दारू पिणाऱ्यांना तीन महिने कारावास आणि दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा प्रस्तावित असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी विधानसभेत सांगितले.

काँग्रेसचे संग्राम थोपटे यांनी गडकिल्ल्यांच्या परिस्थितीबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर उत्तर देताना मुनगंटीवार यांनी सांगितले की, जिथे वीररसाचा इतिहास रचला गेला अशा गडकिल्ल्यांवर सोमरसाचे प्राशन करण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. दारू पिणाऱ्यांना पकडण्यासाठी हेरिटेज मार्शल नेमण्यात येतील. जे स्वयंसेवक असे प्रकार उघडकीस आणतील त्यांना दंडाच्या पन्नास टक्के रक्कम बक्षीस म्हणून देण्याचेही प्रस्तावित आहे. राज्याच्या विधि व न्याय विभागाच्या मंजुरीसाठी हा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. रायगड किल्ला केंद्र सरकारच्या अखत्यारित येतो. तो किमान पाच वर्षांसाठी तरी राज्य सरकारच्या ताब्यात द्यावा, अशी विनंती केंद्राला केल्याचेही ते म्हणाले. 

भीमराव तापकीर यांनी सिंहगड किल्ल्याच्या पुणे आणि कल्याण दरवाजाचा भाग खचत चालल्याचे म्हटले होते, त्यावर सिंहगड आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही मुनगंटीवार म्हणाले.

संरक्षित स्मारकांना ५१३ कोटींचा निधी  

राज्यात ३८७ संरक्षित स्मारके आहेत. मागील सरकारच्या काळात या स्मारकांच्या देखभालीकडे दुर्लक्षच झाले होते. आता मात्र जिल्हा नियोजनापैकी सुमारे ५१३ कोटींचा निधी देण्यात येणार आहे. ७५ स्मारकांच्या ठिकाणी जनसुविधा निर्माण करण्याचे कार्यही हाती घेण्यात आले असून, त्यासाठी ६५ कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. शौचालये बांधण्यासाठी सुलभ इंटरनॅशनलला तीस वर्षांचे कंत्राट देण्यात येणार आहे. सर्व ३८७ स्मारकांवर त्यांची माहिती क्यूआर कोडच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. किल्ल्यांवरील अतिक्रमणेही दूर करण्यात येत आहेत, असे मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :अर्थसंकल्पीय अधिवेशनगडसुधीर मुनगंटीवार