मुंबई : दादर येथील महापौर बंगल्याच्या परिसरात उभारण्यात येणाऱ्या बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकासाठी ठाकरे यांच्या जीवनावरील चित्रपट, ऑडिओ व्हिज्युअल कंटेंट, डॉक्युमेंटरी ड्रामा फिल्म, आर्टिस्टिक कटेंट तयार करण्यासाठी एमएमआरडीएने स्वारस्य निविदा मागविल्या आहेत. या निविदा मीडिया हाऊस, डाक्युमेंटरी फिल्ममेकर, प्रॉडक्शन कंपनींकडून मागविण्यात आल्या आहेत. एमएमआरडीएकडून बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक हे ११,८०० चौरस मीटर क्षेत्रफळावर साकारले जात आहे. या स्मारकाचे काम दोन टप्प्यांत केले जात आहे.
यातील पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण झाली असून त्यात सुमारे १८१ कोटी रुपये खर्चून प्रवेशद्वार इमारत, इंटरप्रिटेशन सेंटर आणि प्रशासकीय इमारत उभारण्यात आली आहे. स्मारकाच्या परिसरात असलेल्या ११५ वर्षे जुन्या महापौर बंगल्याच्या इमारतीचेही नूतनीकरण केले आहे.
राजकीय प्रवास दर्शवणारी माहिती प्रदर्शित हाेणारआता दुसऱ्या टप्प्यातील कामांना सुरुवात केली जाणार आहे. यात भविष्यकाळातील तंत्रज्ञानाचा वापर करून महापौर बंगल्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनपटाचे प्रदर्शन करणारी छायाचित्रे, दृश्यचित्रे आणि त्यांचा राजकीय प्रवास दर्शवणारी माहिती प्रदर्शित केली जाईल. यामध्ये लेझर शो, डिजिटल मॅपिंग, प्रोजेक्शन, चित्रपट, २ डी आणि ३ डी फिल्म, व्हर्च्युअल रिॲलिटी, हार्डवेअर आणि साहाय्यभूत सेवा, तंत्रज्ञानविषयक कामे केली जाणार आहेत, तसेच दृकश्राव्य माध्यमातून कथा सांगितली जाणार आहे. एमएमआरडीएने या कामासाठी सल्लागार म्हणून आभा लांबा असोसिएटची नियुक्ती केली आहे. आता या कामासाठी प्रॉडक्शन हाउसच्या नियुक्तीची प्रक्रिया एमएमआरडीएने सुरू केली आहे.