Join us

कॅन्टीन कर्मचाऱ्यांना मारणे भोवले, मुंबई पोलिसांची कारवाई सुरु; संजय गायकवाड म्हणाले, 'आय डोन्ट केअर!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 16:30 IST

मुंबई पोलिसांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध कारवाई सुरू केली आहे.

MLA Sanjay Gaikwad: मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासात कॅन्टीन कंत्राटदाराला मारहाण केल्याबद्दल मुंबई पोलिसांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. कॅन्टीनमधील राड्या प्रकरणी संजय गायकवाड यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा (एनसी) दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. निकृष्ट दर्जाच्या जेवणावरुन संजय गायकवाड यानी आमदार निवासस्थानी राडा कंत्राटदाराला बेदम मारहाण केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पोलीस योग्य ते करतील अशी प्रतिक्रिया दिली होती.

आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये शिळे अन्न दिल्यामुळे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमधील कंत्राटदाराला मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यानंतर आता संजय गायकवाड यांच्याविरोधात अदखलपात्र म्हणजे एनसी दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून एनसी दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. संजय गायकवाड यांच्या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दोन दिवसांनी ही कारवाई करण्यात आली आहे. कॅन्टीनमधी जेवण डाळ निकृष्ट दर्जाची होते आणि खाल्ल्यानंतर लगेचच अस्वस्थ वाटू लागले, अशी तक्रार गायकवाड यांनी केली होती. 

संजय गायकवाड काय म्हणाले?

"मी कुठलाही मोठा गुन्हा केलेला नाही. मी चांगल्या गोष्टीसाठी सौम्य मारहाण केली आणि चांगल्या गोष्टीसाठी कितीही माझ्यावर गुन्हे दाखल झाले तरी आय डोन्ट केअर," अशी प्रतिक्रिया संजय गायकवाड यांनी दिली.

संजय गायकवाड यांनी मंगळवारी रात्री आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनमधून डाळ व भात खराब दिल्याचा आरोप केला. संजय गायकवाड यांनी कँटिनमधून खोलीमध्ये जेवण मागवलं होतं. मात्र कँटिनमधून पाठवण्यात आलेली डाळ निष्कृष्ट दर्जाची होती आणि तिचा वास येत होता. त्यानंतर संतापलेले संजय गायकवाड कँटिनमध्ये गेले आणि डाळीचा वास घेऊन बघ असं म्हणत त्यांनी कर्मचाऱ्याच्या कानशि‍लात लगावली. गायकवाड यांनी बुक्क्यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केली.

दरम्यान, याप्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनाने आमदार निवासामध्ये जेवण पुरवणाऱ्या कंत्राटदारावरही कारवाई केली आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने आकाशवाणी आमदार कॅन्टीन चालवणाऱ्या अजंता केटरर्सचा परवाना निलंबित केला आहे.  

टॅग्स :संजय गायकवाडमुंबई पोलीसगुन्हेगारी