Join us
Daily Top 2Weekly Top 5

नेस्को कोविड सेंटर मधील नर्सिंग स्टाफच्या समस्यांचे झाले निराकरण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2020 20:42 IST

Corona News : नर्सिंग स्टाफच्या राहण्याची व्यवस्था ही गोरेगाव पश्चिम उन्नतनगर येथील म्हाडाच्या संकुलात करण्यात आली आहे.

मनोहर कुंभेजकर

मुंबई : गोरेगाव पूर्व येथील नेस्को कोविड सेंटर मधील सुमारे 60 ते 70 नर्सिंग स्टाफच्या राहण्याची व्यवस्था ही गोरेगाव पश्चिम उन्नतनगर येथील म्हाडाच्या संकुलात करण्यात आली आहे.मात्र येथील अनेक असुविधांमुळे येथील नर्सिंग स्टाफ त्रस्त होता.या विरोधात त्यांनी आंदोलन देखिल पुकारले होते.येथील पाणी,लाईट,गिझर, ड्रेनेज आणि नेस्को संकुलात येणाऱ्या जेवणा संदर्भात त्यांच्या तक्रारी होत्या.

याची त्वरित  दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली. मुख्यमंत्र्याच्या आदेशानुसार राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत आणि म्हाडाचे सभापती डॉ.विनोद घोसाळकर यांनी नुकतीच येथील म्हाडा संकुलाला भेट देऊन येथील नर्सिंग स्टाफच्या समस्या समजावून घेतल्या. यावेळी म्हाडाचे अधिकारी,पी दक्षिण वॉर्डचे सहाय्यक आयुक्त संतोषकुमार धोंडे,गोरेगाव विधानसभा संघटक दीपक व माजी नगरसेवक दिलीप शिंदे,विधानसभा समन्वयक दीपक सुर्वे व शशांक कामत,म्हाडाचे कंत्राटदार व इतर  मान्यवर उपस्थित होते.

त्यानंतर नर्सिंग स्टाफच्या जेवणाच्या तक्रारीबाबत नेस्को कोविड सेंटरला स्वतः डॉ.दीपक सावंत यांनी भेट देऊन येथील डीन डॉ.नीलम आंद्राडे यांच्याशी चर्चा केली. म्हाडा संकुलात जेवण दुपारी 12 च्या सुमारास पोहचते.मात्र नसिंग स्टाफ काम संपल्यावर दुपारी 3 नंतर त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी येतो.तोपर्यंत जेवण थंड होते अशी त्यांची तक्रार होती.आता येथे ओव्हनची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल तसेच नसिंग स्टाफच्या बस बरोबर जेवण पोहचेल. त्यामुळे त्यांना ताजे जेवण मिळेल असा विश्वास डॉ.दीपक सावंत यांनी व्यक्त केला.

दरम्यान नेस्को कोविड सेंटरच्या किचनला भेट दिली असून येथील जेवणाचा दर्जा चांगला असून भाज्या देखिल स्वच्छ धुतल्या जातात अशी माहिती त्यांनी दिली. येथील नर्सिंग स्टाफच्या सर्व समस्यांचे निराकारण झाले असून पी दक्षिण वॉर्डचे सहाय्यक आयुक्त येथे त्यांचा एक अधिकारी तैनात करणार आहे. येथे लॉगबुक ठेवण्यात येणार असून नर्सिंग स्टाफ त्यांची नोंद येथे करणार आहे.जेणेकरून त्यांच्या समस्या असल्यास त्यांचे निराकरण होईल असा विश्वास  डॉ.दीपक सावंत यांनी शेवटी व्यक्त केला.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यालॉकडाऊन अनलॉकमुंबई महानगरपालिका